ग्रीस देशाचा संक्षिप्त इतिहास

OCR version of G.S Sardesai's book "ग्रीस देशाचा संक्षिप्त इतिहास" (A brief history of Greece) published in 1911.

प्रकरण पहिलें  - आरंभ

 ग्रीस देश युरोपखंडाच्या आग्नेयीस आहे. प्राचीन काळी त्याचा विस्तार हल्लींच्याहून फार मोठा होता. त्याच्या मध्यभागी कॉरिंथची सामुद्रधुनी असून, तिच्या योगानें देशाचे दोन भाग झाले आहेत. प्राचीन ग्रीस देशांत ह्या दोनही भागांचा समावेश होत असून, शिवाय, ईज्यनसमुद्र, आयोनियनसमुद्र व भूमध्यसमुद्र ह्यांतील सर्व बेटे व आशिया - मायनरचा कांहीं भाग हे प्रदेश त्यांत मोडत होते. ह्या दूरदूरच्या प्रदेशांत ग्रीक लोकांनी फार प्राचीन काळीं वसाहती केल्या होत्या.

 मुख्य ग्रीस देशांत प्रथम हेलन नांवाचे लोक राहत होते. हें नांव ग्रीक लोक अजूनही वापरतात ; व त्यावरून आपल्या देशास हेलास असे म्हणतात. हा देश फार सुंदर आहे. त्यांत अनेक डोंगराच्या रांगा आहेत, त्यामुळे त्याचे स्वभावतः पुष्कळ विभाग झाले आहेत. ह्या प्रत्येक विभागांत प्राचीन काळापासून निरनिराळे लोक राहत होते. प्रत्येक जातीच्या लोकांचें स्वतंत्र राज्य व स्वतंत्र व्यवस्था असे. ह्यामुळे देशांत निरनिराळ्या वेळीं अनेक लहान लहान स्वतंत्र राज्यें उतन्न झालीं, तीं कालांतरानें पुढें उदयास आली.

 हेलन लोकांच्या पूर्वी ग्रीस देशांत पेलारजन्स नांवाचे रानटी लोक राहत होते. पुढे हेलन्स हे पूर्वेकडील बाजूनें ग्रीस देशांत आले. त्यांनी प्रथम थेसली प्रांतांत वसाहत केली ; व हळूहळू दक्षिणेकडे प्रवेश केला. असें करतां करतां त्यांनी अनेक स्वतंत्र राज्य स्थापिलीं.

 असे सांगतात कीं, हेलन लोकांचा मूळ पुरुष हेलन नामक एक राजा होता, तो ग्रीक लोकांचा देव जुपिटर ह्याचा पुत्र होय. ह्या राजाचेंच नांव पुढे सर्व लोकांस प्राप्त झालें. ह्या हेलन राजाचें वृत्त ऐतिहासिक नसून काल्पनिक आहे. अर्थात् तें विश्वास ठेवण्या लायक नाहीं.

 ग्रीसच्या इतिहासाच्या पहिल्या भागास वीरकाल असे म्हणतात. ह्या वीरकालीं देशांत अनेक वीरपुरुष उदयास आले. त्यांच्या कथा व कवनें देशांत उपलब्ध होतीं, तीं तपासून त्या काळचा इतिहास लिहिलेला आहे. ह्या वीरपुरुषांचा अवतार देवांपासून झाल असें ग्रीक लोक समजत, व देवांप्रमाणे त्यांची पूजा करीत. ग्रीस देशांत पुढे मोठमोठीं सरदार घराणी उदयास आलीं, तीं अशा एखाद्या वीरपुरुषास आपला मूळपुरुष समजत. ह्या वीरपुरुषांचा काळ सुमारें दोनशें वर्षांचा, म्हणजे, हेलन्स लोक प्रथम ग्रीस देशांत आले तेव्हांपासून, ट्रॉय्च्या वेढ्यापर्यंत, समजला जातो. ह्याच काळांत ग्रीक लोकांचीं राज्य स्थापन झालीं ; व त्यांच्या संस्था उदयास आल्या. ह्या राज्यांच्या व संस्थांच्या मुळांशीं अनेक दंतकथा जोड लेल्या आढळतात, त्या मात्र निवळ काल्पनिक होत. उदाहरणार्थ, असे सांगतात कीं, सेक्रॉप्स् म्हणून एक राजा होता, त्यानें आथे न्सची स्थापना केली ; व इजित देशांतील अनेक उपयुक्त गोष्टी ग्रीस देशाच्या अॅटिकाप्रांतांत चालू केल्या. त्यानें एकंदर बारा शहरें स्थापिलीं, त्यांतील सर्वांत मोठें आयेन्स होय. आजी म्हणून देवी होती, तिची कृपा देशावर सदोदित राहवी, ह्या हेतूनें तिचें नांव त्यानें ह्या शहरास दिलें. ही गोष्ट इ.स.पू. १५५० वे वर्षी घडली असें सांगतात. पण आथेन्सच्या स्थापनेचा इजिप्तशी जोडलेला संबंध खरा असण्याचा संभव फार थोडा आहे. आथेन्स शहर फिनिशन लोकांनी स्थापिलें असावें. हे फिनिशन लोक आशिया खंडाच्या पश्चिम किना - यावर राहत असून मोठे सुधारलेले होते, व यांनी भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्यावर व्यापाराची अनेक ठाण वसविलीं होतीं, हें सुप्रसिद्ध आहे. त्यांच्या वेळी ग्रीक लोक रानटी स्थितीत असून रोमचा जन्मही झाला नव्हता. आथैन्ससारखें व्यापाराच्या सोयीचें ठिकाण फिनिशन लोकांच्या नजरेस आलें नसेल हें संभवत नाहीं. एक दंतकथा अशी आहे कीं, कॅड्मस नामक फिनिशन गृहस्थानें आपली लिपी ग्रीस देशांत प्रथम आणिली, व थीब्स् शहर वसविलें. ही कथा खोटी मानिली, तरी ग्रीक लोकांच्या प्राचीन इतिहासाशीं फिनिशन लोकांचा संबंध नव्हता असे म्हणतां येत नाहीं.

 प्रत्येक राज्याच्या मुळाशीं अशी कांहीं तरी दंतकथा आहेच. प्रत्येकाचे मूळपुरुष निराळे असून ते ज्याचे त्यास पूज्य आहेत. मात्र ते पुरुष खरोखरचे होते असे मानण्यास आधार नाहीं. ग्रीक लोकांचा मात्र त्यांच्या ठिकाणी पूर्ण विश्वास असे ; व ह्या वीर पुरुषांच्या योगानें ग्रीक लोकांचे संप्रदाय, रीतीभाती, राजकीय व धार्मिक संस्था इत्यादिकांवर अनेक परिणाम घडले आहेत.

 प्राचीन ग्रीक लोक मूर्तिपूजक होते. त्यांच्या अनेक देवता असून त्यांत जुपिटर ऊर्फ शियस ह्यास अग्रस्थान मिळालें होतें. थेसली प्रांतांत आलिंपस नांवाचा पर्वत आहे. त्याच्या शिखरावर ह्या देवाचा दरबार भरत असे. जुपिटरच्या खालोखाल अपालो होय. तो विद्या व संगीतकला ह्यांचें अधिष्ठान असून, शिवाय पशूंचें संरक्षण करणें, पापाचरणाबद्दल पारिपत्य करणें, व देवेंद्र जो जुपिटर त्याचे हुकूम खालीं मानवांस कळविणें, हीं कामें अपलोचीच होतीं.

 ग्रीक धर्मातील मुख्य वीरपुरुष हर्क्युलीज, थिसियस, ट्रिप्टो लिमस, एस्क्युलेपियस, आणि मायनोज (Minos) हे होत. अगॅमेम्नॉन, अॅकिलीज, नेस्टॉर आणि यूलिसीज, हे त्यांच्या खालच्या पायरीचे असून, शिवाय ट्रोजन युद्धांत प्रसिद्धीस आलेल्या आणखीही अनेक वीरपुरुषांस ग्रीक लोक पूज्य मानीत असत.
प्राचीन ग्रीक इतिहासांतली बरीच विश्वसनीय गोष्ट म्हणजे ट्रॉयचा वेढा किंवा ट्रोजन युद्ध ही होय, हे युद्ध इ.स.पू तेराशें व एक हजार ह्या काळाच्या दरम्यान झालें. ह्या युद्धाचें वर्णन प्राचीन कवितेंत केलेले आहे, युद्ध झाल्यावर दोन तीनशें वर्षांनी होमर नांवाचा एक विख्यात कवि झाला, त्यानें या युद्धाचं वर्णन कवितेंत केलें. त्याचा सारांश असा.

 आशियाच्या पश्चिमकिनाऱ्यावर पूर्वी एक सुसमृद्ध राज्य होतें. त्याची राजधानी ट्रॉय शहर होतें. तेथें प्रायम नांवाचा राजा राज्य करीत होता. त्यास पॅरिस नांवाचा एक मुलगा होता. तो मुलगा एकदां ग्रीस देशांतील स्पार्टाचा राजा मेनिलॉस ह्याच्या दरबारीं गेला, तेथें मेनिलॉसनें त्याचा उत्कृष्ट सत्कार केला. तथापि मेनिलॉसशीं कृतघ्न वर्तन करून, त्याची बायको हेलन हिला पळवून, पॅरिसनें आप ल्याबरोबर ट्रॉय शहरी नेलें. ह्या कृत्याचा सूड घेण्याकरितां मेनिलॉस ह्यानें सर्व ग्रीक राजे एकत्र जमवून प्रायमशीं युद्ध सुरू केलें, व ट्रॉय शहरास वेढा घातला. शहराची तटबंदी मजबूत होती, त्यामुळे हा वेढा दहा वर्षे चालला. शेवटीं युक्तीनें तें शहर ग्रीक लोकांनी काबीज केलें. ह्या युद्धांत अनेक वीरांनीं नानाप्रकारची अघटित व अचाट अशीं शूर कृत्यें केली. ग्रीक लोकांनी शेवटची म्हणून एक युक्ति केली ती अशी की, त्यांनीं एक लांकडाचा मोठा प्रचंड घोडा बनवून तटाबाहेर ठेविला, आणि त्यांत मेनिलॉस व दुसरे पुष्कळ योद्धे गुप्तपणे जाऊन बसले. इकडे बाकीच्या फौजेनें वेढा उठवून निघून जाण्याचा बहाणा केला. शत्रु निघून गेलेले पाहून ट्रोजन लोकांनी तो लांकडाचा घोडा ओढीत ओढीत शहरांत आणिला. त्यांत बसलेले गुप्त लोक रात्री बाहेर आले, व त्यांनीं किल्ल्याचे दरवाजे उघडून ग्रीक फौजेस आंत घेतलें. अशा रीतीनें त्यांनी ट्रॉय शहर काबीज करून उद्धृस्त केलें ; व मेनिलॉसची बायको हेलन हिला परत आणिलें.

 पुढें ग्रीक राजे स्वदेशी परत येऊन पाहतात, तों परकी लोकांनी आपलीं राज्य काबीज केलीं आहेत, असें त्यांस आढळले. तेव्हां तेथेंही पुनरपि युद्धे होऊन कांहीं राज्यें ग्रीक राजांस परत मिळालीं, व कांहींची राज्ये जाऊन त्यांस देशत्याग करावा लागला. ह्या देशत्याग केलेल्या मंडळींत ऑडिसियस ऊर्फ यूलिसीज म्हणून इथाका बेटाचा राजा होता. ट्रॉयचें युद्ध झाल्यानंतर दहा वर्षेपावेतों अनेक कारणामुळे तो स्वदेशास परत येऊं शकला नाहीं. तेव्हां समुद्रांत वादळ होऊन त्यांत तो मरण पावला असावा, असें सर्वोस वाटले. त्याची बायको पेनिलोप म्हणून होती. नवरा मेला असे समजून तिची मागणी करण्यास अनेक राजे आले. परंतु ती पतिव्रता होती, त्यामुळे ती पुनर्वित्राइ करण्यास कबूल होईना ; व कांहीं तरी काम काढून तें संपल्याशिवाय लग्नाचा विचार करावयाचा नाही, असे सर्वस तिनें उत्तर दिलें ; व जितकें काम ती दिवसा करी, तितकें सर्व तो रात्रीं उलगडून टाकी. अशा रीतीनें, यूलिसीज परत येईपावेतों तिचें काम पुरें झालें नाहीं, पुढें एके दिवशीं यूलिसीजनें भिक्षेकन्याच्या वेषानें आपल्या वाड्यांत येऊन बायकामुलांस ओळख दिली. त्याच्या मुलाचें नांव टेलेमेक्स असें होतें. ह्या मुलाच्या साह्यानें यूलिसीजनें आपली बायको व राज्य परत मिळविलें, व शत्रूंचा पराभव केला. ह्याप्रमाणे ट्रॉयचें युद्ध व यूलिसीजचें प्रत्यागमन ह्या दोन कथांची वर्णन होमर कवीनें अनुक्रमें इल्यड व ऑडिसे ह्या दोन ग्रंथांत केली आहेत. ग्रीक लोकांची पुढें भरभराट झाली, तेव्हां ते ह्या ग्रंथांचें अध्ययन करूं लागले. प्रत्येक विद्यार्थ्यास हे ग्रंथ पढावे लागत. हल्लीं सुद्धां ग्रीक भाषा शिकणारे ह्याच ग्रंथांचें अध्ययन करितात.

 हे ग्रंथ होमर कवीने लिहिले अशी प्रसिद्धि आहे. तथापि ते त्यानें एकट्यानेंच लिहिले, की त्याचे निरनिराळे भाग अनेकांनीं भिन्न वेळीं लिहिले ह्याविषयीं वाद आहे. ग्रीस देशांत त्या काळी अनेक कवि होते. मोठमोठ्या समारंभांच्या प्रसंगी ते नानाप्रकारची स्वतंत्र कवनें करून सभेत म्हणून दाखवीत. त्यांत ट्रोजन युद्धाची कथा वर्णिली जात असेल ह्यांत संशय नाहीं. अशा अनेक विस्कळित कवनांचा होमरनें एकत्र संग्रह करून, त्यास इत्यड हैं नांव दिलें असावें. होमर हा आशियांतील आयोनियाचा राहणारा असून, त्याच्या वेळीं ग्रीक लिपीही सुरू होतीसें दिसत नाहीं. त्यानें संग्रह केलेली कवनें लोकांनीं प्रथम तोंडपाठ करून ठेविली असावीं, व कांहीं काळ पावेतों तीं लोकांत तशींच प्रचलित असावी, असा संभव दिसतो,ख्रिस्ती शकापूर्वी सहाव्या शतकापावेतों कागदावर लिहि ण्याची कला ग्रीक लोकांस साध्य झाली नव्हती. त्यापूर्वी लांक्रूड, पितळ, किंवा दगड ह्यांवर ते आपले लेख कोरून ठेवीत असत. इ.स.पू. ५७३ ह्यावर्षी इजित देशांत राज्यक्रान्ति होऊन अमा सीज नांवाच्या पुरुषास तेथील राज्य प्राप्त झाले. त्यानें ग्रीक लोकांशीं स्नेह जोडिला, व त्यांस आपल्या राज्यांत आणून वसाहती व व्यापार करण्याची परवानगी दिली. ह्या परिचयामुळे इजिप्त देशां तील पेपिरस वनस्पति ग्रीक लोकांनी पुढे आपल्या देशांत आणिली. ही वनस्पति इजित देशांत पुष्कळ होत असे, व तिचा तेथील लोक एक प्रकारचा कागद बनवीत. हल्लींचा कागदाचा वाचक ' पेपर ' हा इंग्रजी शब्द ह्या पेपिरस वरूनच झाला आहे. ग्रीस देशांत हा कागद आल्यापासून लेखनकला सर्वत्र पसरली. त्यानंतरच होम रचे ग्रंथ लिहिले गेले. पूर्वी ते लोकांस मुखोद्गत मात्र असत. होमर आशियाच्या पश्चिम किनाऱ्यावर राहत होता, तेथून कोणीं तरी हे ग्रंथ ग्रीस देशांत आणून हल्लींच्या स्थितीत लिहून काढिले. हे ग्रंथ प्रथम निर्माण झाले, त्या वेळीं ग्रीक लोकांची स्थिति व रीतीभाती कशा होत्या, ह्याची माहिती ह्या ग्रंथांवरूनच कायती उपलब्ध आहे.

 ट्रोजन युद्ध झाल्यावर बऱ्याच काळानें होमर अवतीर्ण झाला. तो इ.स.पू. नवव्या शतकांत झाला असावा असा तर्क आहे. त्या दरम्यानच्या काळांत ग्रीसच्या उत्तरभागांतील थेसली प्रांतां तून डोरियन नांवाचे लोक दक्षिणेंत आले व त्यांनी सर्व देश काबीज केला. म्हणजे नॉर्मन लोकांनी इंग्लंडांत येऊन सॅक्सन लोकांना जिंकिलें, त्याचप्रमाणें डोरियन लोकांनीं येऊन पहिल्या हेलन लोकांना जिंकिलें, ह्या डोरियन लोकांच्या युद्धांची हकीगत फारशी उपलब्ध नाहीं. परंतु त्यांनी देशांत अनेक राज्यें स्थापिली. तेव्हांपासून पुढें ग्रीक लोकांच्या तीन पृथक् जाती दिसून येतात, त्या ह्या : ईओलियन्स, आयोनियन्स्, आणि डोरियन्स ह्या सर्वांस मीक असेंच म्हणत ; तरी त्यांजमधील परस्पर भेद नेहमीं कायम.होते. उदाहरणार्थ, अथोनियन लोक हे आयोनियन जातीचे असून स्पार्टन लोक डोरियन जातीचे होते. असाच भेद इंग्लंडांतही नार्मन व सॅक्सन ह्या दोन लोकांमध्यें पुष्कळ वर्षे कायम होता, हैं इंग्लंडच्या इतिहासज्ञांस महशूर आहे.


प्रकरण दुसरे - होमरच्या वेळची ग्रीसची स्तिती

 होमरच्या काव्यांत ग्रीसदेशाची माहिती मिळते, तिजवरून असें दिसतें कीं, उत्तरेस आयोनियन किनाऱ्यावर थेसली, इटोलिया व आकरनेनिया ; मध्यभागी डोरिस व फोसिस ; आणि कारिंथ आखाताच्या किनाऱ्यावर लोक्रिस, असे उत्तर प्रांताचे सहा भाग त्या वेळीं होते. उत्तर भाग व दक्षिण भाग हे कॉरिंथच्या संयोगिभूमीनें जोडलेले असून, तिजमधून एक डोंगराची रांग दक्षिणोत्तर गेली आहे ; व दक्षिणेस ह्या रांगेस अनेक फांटे फुटल्यामुळे, दक्षिण भाग जो पिलॉपोनेसस त्याचे अनेक विभाग झाले आहेत. त्या विभागांस आकेया, आर्केडिया, एलिस, मेसेनिया, आर्गोलिस आणि लॅको निया अशीं नांवें होतीं. स्पार्टा शहर ह्या लॅकोनिया प्रांतांत आहे. वरील सर्व प्रांतांत स्वतंत्र राज्यें होतीं. त्यांतील राज्यव्यवस्था बहु तेक एकसारखीच असे. मुख्य राजा असे, त्याची गादी वंशपरंपरा चाले. युद्धप्रसंगी सर्व अधिकार राजाचे हातीं असून, शांततेच्या दिवसांत राज्यकारभार पाहणारी त्याच्या हाताखालीं एक सभा असे, मुख्य न्यायाधीशाचें कामही राजाकडेच असून तो न्यायसर्भेत येऊन इनसाफ करी. ह्या न्यायसभा बाजारच्या चौकांत अथवा अन्यत्र उघड्या जागेत भरत न्यायाधीशांकरितां शिलासनें केलेली असून, तीं अर्धवर्तुलाकृति मंडळांत माडलेली असत.

 होमरच्या काळीं ग्रीक लोक बरेच सुधारलेले असून उपयुक्त कलांचें ज्ञान त्यांस बरेंच होतें. तथापि तें ज्ञान सर्व लोकांत पसरलेलें नस ल्यामुळे, शिल्पज्ञ लोकांस कवि किंवा वैद्य ह्यांजप्रमाणेंच उच्च मान मिळत असे. लोकरीचीं वस्त्रे विणणें, व मातीचीं ओबडधोबड भांडों बनविणें ह्या गोष्टीं त्यांस येत होत्या. इजिप्त देशांतून मलमल, आणि बाबिलोन, टायर व सिडोन येथून गालिचे, ग्रीस देशांत येत असत. कित्येक श्रीमंत लोकांपाशीं चांदीचे झाले असत, पण ते परदेशांतून आलेले असावे.

 होमरच्या वेळीं व पुढेही ग्रीक लोकांचे सर्व सामान्य धंदे म्हणजे शेती, दारू तयार करणें, व गुरेंमेंढरें बाळगणे हे होते. पण त्या वेळीं निरनिराळ्या राज्यांमध्ये एकसारखे युद्धप्रसंग चालू असल्या मुळे हे उद्योग बंद पडत ; व शेतकरी असो कीं गवळी असो, त्यास लढाईवर जाणें भाग पड़े.

 राजधानीच्या मध्यभागी किंवा जवळपास उच्चभागी एक लांकडी किल्ला बांधलेला असून, त्यांत तत्कालीन राजे राहत असत. ह्या किल्ल्यास आक्रोपोलिस असें म्हणत. श्रीमंत लोकांचे वाडे लांकडीच असत ; व त्यांस वाडे असें नांव होतें तरी, ती केवळ ओबडधोबड लांकडी घेरें असत. ह्या वाड्यांत पाहुण्यांच्या सोयीसाठीं मोठमोठीं दालनें बांधिलेलीं असत. कारण पाहुण्यांचा आदरसत्कार करण्यांत ग्रीक लोक मोठें अगत्य दाखवीत. त्यांजकडे कोणीही गृहस्थ आला की, त्याचा सत्कार करणें आपले कर्तव्य आहे असें ग्रीक लोक समजत ; तो शत्रु आहे कीं मित्र आहे, ह्याचा विचार ते प्रथम करीत नसत.

 डेन्स लोक ज्याप्रमाणें पर्वी समुद्रावर चोन्या करून इंग्लंडवर धाड घालीत, त्याचप्रमाणें प्राचीन काळीं ग्रीक लोकांत चांचेपणाचा धंदा करूनही पुष्कळ बडे लोक उदयास आले होते. आजूबाजूच्या किना व्यांवर धाड घालून लूट पैदा करणें हें राज लोक सुद्धां मोठें वीर्योत्ते जक व भूषणावह समजत ह्या लुच्या स्वारीत ते जीं गलबतें वापरीत, तीं लांब व चिंचोळी असून, त्यांस एक डोलकाठी, व शीड व वल्हीं असत. त्यांपैकी कित्येक मोठी असून त्यांत शंभर शंभर लोकांचा समावेश होत असे. तथापि त्या वेळी होकायंत्र माहीत नसल्यामुळें, समुद्रकिनारा सोडून हीं गलबतें फारशीं दूर जात नसत.

 हा चांचेपणाचा धंदा अगदीं सार्वत्रिक होता. शेतकरी कामास जाऊं लागला, कीं त्यास लढाईच्या तयारीनें जावें लागे ; कारण लुटारू लोकांचा हल्ला केव्हां येईल त्याचा नेम नसे. ह्या धास्ती पासून लोकांचा बचाव करण्यासाठी सर्व संस्थानांनी मिळून एक प्रतिनिधिसभा स्थापन केली. ह्या सभेस प्रत्येक संस्थानांतून दोन प्रतिनिधि येत. ही सभा वर्षातून दोनदां भरे : एकदां पावसाळ्यांत थर्मापिली येथें, व पुनः वसंतकाळीं डेल्फाय येथें. ह्या सभेस अॅफिक्टिओनिक (amphictyonic) म्हणजे अन्योन्यस्त्नेहसंवर्धक असें नांव होतें. सर्व राष्ट्रांनी शांततेच्या व युद्धाच्या प्रसंगी पाळ. ण्याचे नियम ह्या सर्भेत ठरत ; तसेंच धार्मिक संप्रदाय कोणी मोडिल्यास, त्यास शासन करण्यांत येत असे ; व ठरविलेले नियम बरोबर पाळले गेले कीं नाहीं, ह्याचा खलही ह्या सहामाही बैठकीत होत असे. ह्या सभेचे सभासद पांच वर्षातून एकदां आपल्या सर्व कुटुंबांसुद्धां डेलॉस येथें जमून एक मोठा धर्मोत्सव करीत.  ग्रीक लोकांच्या धर्मात सण व उत्सव ह्यांचें महत्त्व मोठे असे. त्यांजविषयीं होमरच्या ग्रंथांत विशेष माहिती नाहीं. तथापि देशां • तील सर्व लोक एकत्र जमून देवाचा उत्सव व यज्ञयाग करीत. त्या वेळेस भजन होई, व मिरवणूक निघे. ग्रीक लोकांतील सार्व जनिक भजनांचा हा आरंभ होय. ह्या भजनांत वाजंत्रों व झांजा वापरीत.

 होमरच्या वेळीं ग्रीक लोकांचीं देवळें लहान व लांकडी असूनही तीं एखाद्या मोठ्या राईत बांधिलेली असत, व आंत दिवे लावीत. पुढें देशांत संपत्ति वाढली, तेव्हां लांकडी काम काढून लोकांनी ते दुगडी केलें, रांईतील झाडे तोडण्याची मनाई असे. कोणी एखादा गुन्हेगार म्यायासनासमोर येण्याचें चुकवून ह्या राईत लपून राहिला तर, तो तेथें आहे तोपर्यंत त्यास पकडले जाण्याची भीति नसे. ग्रीक लोकांत उपाध्यायांचा म्हणून निराळा वर्ग नव्हता. सार्वजनिक सणांच्या प्रसंगी उपाध्यायांचें काम करण्यास लायक इसम नेमीत, व प्रत्येक कुटुंबांतला मुख्य इसम आपापल्या घरीं तें काम करीत असे.

 होमरच्या वेळेस एकंदर लोकांचे तीन वर्ग होते. पहिला वर्ग, युद्धांत पराक्रम करून व विजय संपादून ज्यांनी देश जिंकला होता, अशा लोकांचा ; ते आपणांस सरदार किंवा योद्धे असें समजत. दुसरा वर्ग जिंकलेल्या लोकांचा ; व तिसरा वर्ग गुलामांचा.

 प्राचीन ग्रीक लोकांची राहणी अगदी असे. त्यांच्या घरांत मेजें, खुर्च्या व बांकें असें सामान असून, शिवाय कांहीं श्रीमंतांच्या घरांतून पलंग असत. त्यांवर वाघ किंवा अन्य जनावरां च्या चामड्यांच्या गाद्या घातलेल्या असत. गरीब लोक जमिनीवर मेंढ्यांची चामडी, वाळलेली पानें किंवा लव्हाळे आंथरून त्यांवर निजत. पुरुष वरपासून खालपर्यंत अंग झांकणारें धोतर नेसत, व त्यावर एक लोंकरीची शाल पांघरीत. बायका लांबच लांब बाह्या असलेला एक झगा अंगांत घालून त्यावर पुरुषांप्रमाणेच शाल पांघरून घेत. हा पोषाख श्रीमंत लोकांचा झाला. पण सामान्य गरीब लोक बकयां मेंढ्यांची कातडी नेसत. सरदार लोक लढाईच्या प्रसंगी अंगात चिलखत घालून रथारूढ होत. युद्ध हें त्यांचें मुख्य काम असल्या मुळें, शस्त्रें, घोडे व रथ हीच कायती त्यांची मुख्य मालमत्ता असे.

 घरांत ते कसे राहत ह्याची माहिती फारशी मिळत नाहीं. मोठमोठ्या भोजनप्रसंगी मेजवानीच्या दालनांत लोक चौफेर भिंती पाठ लावून बसत ; व प्रत्येकाच्या पुढे लहानशा चौरंगावर पात्र ठेविलेलें असे. दालनांतील मधला भाग मोकळा असून तेथें वाजंत्री वाद्ये वाजवून जेवणारांची करमणूक करीत. गोमांस, मेंढ्याचें, वकऱ्याचें, व डुकराचें मांस, पनीर ( Cheese ), आणि फळें हे खा प्याचे मुख्य पदार्थ असत ; व दारूंत पाणी मिसळून तें ते पीत, दारूचें मिश्रण एका मोठ्या घागरींत तयार करून ते प्रत्येकास वाढीत, भांडे तोंडास लावण्यापूर्वी प्रत्येक इसम थोडेंसें पेय जमिनीवर ओती, व त्या वेळीं ' अपालो तुला अर्पण ;  " देवी तुला अर्पण ", असें म्हणून इष्टदेवतेचें स्मरण करी. ह्या विधीस नैवेद्य असें म्हणतां येईल. भांडर्डी व प्याले बहुतेक मातीचे असत ; पण श्रीमंत लोकांच्या घरी मेजवानीच्या प्रसंगीं कधीं कधीं चांदीचे प्यालेही दिसत असत.


प्रकरण तिसरे - अथेन्सचे राज्य

 ग्रीस देशांत पुष्कळ लहान लहान राज्यें होती हैं वर सांगितलेंच आहे. त्यांत आथेन्स आणि स्पार्टी हीं मुख्य व विशेष प्रवल होतीं. आथेन्सची स्थापना केव्हां झाली तें बरोबर सांगतां येत नाहीं. प्रथम अँटिका प्रांताचे अनेक लहान लहान विभाग होते. प्रत्येक विभागावर स्वतंत्र राजा होता. वास्तविक म्हटले तर हे विभांग अगर्दीच लहान म्हणजे दोन तीन गांव मिळून झालेले होते. म्हणून त्यांस राज्य म्हणण्यापेक्षां संस्थानें म्हणणें वरें, निरनिराळ्या संस्थांनांत नेहमीं तंटे व लढाया होत. पुढें कांहीं काळाने बारा संस्थानें एक झालीं, व त्यांचें प्रमुखत्व आथेन्सकडे आलें, त्या वेळीं एकमेकांनीं एकमेकांस मदत करून सर्वांचा बचाव करावा असा विचार ठरला. सेक्रॉप्स् आणि त्याचीं बारा शहरें ह्यांविषयीं जी कथा प्रचलित आहे, ती ह्या वरील बारा संस्थानांच्या एकीपासून निघाली असावी. कांहीं काळ लोटल्यावर ह्या सर्व संस्थानांचें एकच राज्य होऊन, त्याची राजधानी आथेन्स शहर झालें ; व सर्व राज्यकारभार आथेन्स येथें होऊं लागला.

 अशी एक दंतकथा आहे कीं, थीसियस नांवाच्या राजानें ह्या वरील संस्थानांची एकी केली, त्यानें आथेन्स शहर वाढविलें,देवालयें बांधिली, आणि सर्व अॅटिकांतील लोकांसाठी कायदे व निबंध तयार केले. हा थीसियस कोणी खराखुरा पुरुष झाला, की केवळ काल्पनिक होता, हैं निश्चित सांगतां येत नाहीं. एवढें खरें, कीं अथीनियन लोक त्यास फार पूज्य मानीत, व देवाप्रमाणें त्वाची पूजा करीत. तथापि तो काल्पनिक पुरुष असावा असे दिसतें. कारण आथेन्सचे कायदे एकाने तयार केलेले नाहीत, ते निरनिराळ्या वेळीं तयार झाले आहेत. ॲटिकांतील लोकांचें एक राज्य झाल्यावर, सर्व लोकांचे चार भाग व ह्या प्रत्येक भागाचे तीन पोटभाग करण्यांत आले. ह्या पोटभागांस ' फ्रेट्रिया, अशी संज्ञा होती. फ्रेट्रिया म्हणजे एक जात. प्रत्येक फ्रेटियांत अनेक गोत्रांचे म्हणजे अनेक मूळपुरुषांगसून वृद्धि पावलेले लोक असत ; एका गोत्रांत अनेक कुटुंचें असत. ह्या सर्व विभागांत जेवढ्यांची गणना असे, तेवढ्यांसच ' आथेन्सचे नगरवासी अशी संज्ञा असून, त्यांस कांहीं विशिष्ट हक्क असत. एका फ्रेट्रियांत सुमारें तीस गोत्रे असत, प्रत्येक गोत्राची विशिष्ट देवता असून, तिचेंच भजन व पूजन त्या गोत्रांत चाले. प्रत्येक गोत्राचे विशिष्ट कुलाचार असून, त्याचीं प्रेतें पुरण्याची जागा पृथक् असे. तसेंच प्रत्येक कुटुंबांतील धार्मिक संस्कार निराळे असून ते त्या कुटुंबांत नेहमीं चालवीत. एखाद्या कुटुंबाचा निर्देश होऊन, कुळधर्म बंद पडले तर, सर्व देशावर देवाचा कोप होऊन कांहीं तरी आपत्ति येईल, असा लोकांचा समज होता.

 इ.स.पू. नवव्या शतकाचे अखेरीस आथेन्सची राज्यसत्ता मोडली ; व हळू हळू प्रजासत्ताक राज्य स्थापन होण्यास प्रारंभ झाला, पहिल्या प्रथम राजा जाऊन त्याच्या जागीं आर्कन नांवाचा एक मुख्य अधिकारी म्ह ० मॅजिस्ट्रेट नेमण्यांत आला ; त्यांचा अधिकार त्याच्या हयातीपर्यंत चाले. असा बदल होण्याचें कारण दंतकथेवरून असे दिसतें कीं, एकदां पिलॉपोनेसस येथील फौजेने ॲटिकावर स्वारी केली. तेव्हां डेल्फाय येथील अपॉलोचा कौल घेण्याकरितां आथेन्समधून वकील पाठविण्यांत आले. त्या वकिलांनी देवीचा कौल घेऊन असा निरोप आणिला की, आये मंसचा राजा मरेल तरच शत्रूचा पराभव होईल. हा निरोप आथेन्सचा राजा कोड्स झानें ऐकिला व आपला जीव देण्याचा निश्चय केला. नंतर आपण होऊन तो कोणास न कळवितां शत्रूच्या फौजेंत शिरला, तेथें त्यास शत्रूनी न ओळखतां ठार मारिलें. पुढे शत्रूस ही सर्व गोष्ट समजून, आथेन्स जिंकण्याचें काम दुर्घट आहे अशी त्यांची खात्री झाली, व ते स्वदेशी परत गेले. इकडे आथेन्सच्या लोकांनी राजा मेल्यावर आर्कनची नेमणूक केली.

 वरसांगितलेल्या डेल्फायच्या कौलाचें महत्त्व राज्यकारभारत अतोनात होतें. राष्ट्राचे राजकीय व खासगी व्यवहार एवढ्याश्या यःकश्चित् गोष्टीवर अवलंबून असलेले इतिहासांत क्वचितच आढळतात. ग्रीक लोकांचा व पुढें रोमन लोकांचा ही असा समज होता, कीं ह्या कौलांच्या द्वारे देव आपली इच्छा प्रगट करितात. प्राचीनकाळी ग्रीस देशांतच नव्हे तर, त्या वेळच्या मूर्तिपूजक राष्ट्रांत अपॉलोचें प्रस्थ मोठें होतें. त्याचें देऊळ डेल्फायच्या बेटावर एका राईत असून आंत सोन्याची मूर्ति होती. देऊळ फुलांच्या माळांनी सदैव शृंगारि लेलें असे. तेथें नेहमीं सहा पुजारी असत. सर्वांच्या प्रश्नांची उत्तरें देण्याचें काम ह्या पुजा - यांकडे असल्यामुळे त्यांस अतिशय महत्त्व आलें होतें. सर्व ग्रीक लोकांची अशी पक्की समजूत होती कीं ह्रीं उत्तरें खास अपॉलोकडूनच येतात. परंतु हे पुजारी राज्यांतील प्रमुख लोक असल्यामुळे त्यांच्या मर्जीस येईल त्याप्रमाणे लोकांस ते प्रश्नांचीं उत्तरें देत ह्यांत कांहीं संशय नाहीं. आधीं तें देऊळच एका अवघड ठिकाणीं बांधिलेलें होतें. त्यांत खाली एक मोठें भुयार होतें ; त्यांतून दुर्गधयुक्त हवा वर येत असे ; आणि तिचा श्वासोच्छ्वास करणारास घेरी येऊन चमत्कारिक वाटल्याशिवाय राहत नसे. भुयाराचे तोंड नेहमीं बंद असे. पण प्रश्न विचारावयाचा असे तेव्हां त्या तोंडावर एक तिवई ठेवीत ; व तिजवर एक बाई बसवीत. ह्या बाईला पायथिया असे म्हणत. तिला तिवईवर बसविल्यावर मग भुयाराचें द्वार उघ डीत, त्याबरोबर ती दुर्गंधीनें घुसमटून चमत्कारिक हातवारे व वड बड करूं लागे, की मग तिच्या अंगांत देव आला असें लोकांस वाटे. अंगांत आल्यावर ती जे शब्द उच्चारी, ते सर्व शब्द पुजारी लिहून घेत ; व मागून त्याची कविता बनवून ती पृच्छकांच्या हवाली करीत. ह्या कवितेंतील शब्दरचना अशी घोटाळ्याची असे कीं, त्यांतून वाटेल तो अर्थ निघावा. तेणेंकरून, पुढें कसाही प्रकार घडून आला तरी, भविष्य खरें झालें अशी लोकांची खात्री करण्यास अडचण पडत नसे. म्हणून देवाचा कौल खोटा ठरण्याचा प्रसंगच कर्धी येत नसे.

 ह्याप्रमाणें डेल्फायच्या कौलार्चे महत्त्व अतिशय वाढलें होतें. पायथियाचें काम करण्याकरितां आरंभी एखादी हलक्या कुळांतील बाई आणीत. एकवार तिचा देवळांत प्रवेश झाल्यावर, तिला देऊळ सोडून जाण्याची किंवा लग्न करण्याची मनाई असे. एकदां अशी एक तरुण स्त्री वरील नियम मोडून पळून गेली, तेव्हां असा कायदा करण्यांत आला कीं, पन्नास वर्षांखालील बाईस देवळात घेऊं नये, आरंभी पुष्कळ दिवस पायथियाचें काम एकच बाई करीत असे ; पण पुढे पुढें पृच्छकांची संख्या अतोनात वाढल्यामुळे दोन बाया ठेवण्यांत आल्या, व दुर्गंधयुक्त हवेनें एखादी बाई क्वचित्प्रसंगी आजारी वगैरे झाल्यास, काम बंद पडूं नये म्हणून, तिसरी एक बाई देवळांत आणून तयार ठेवीत असत.

 डेल्फायच्या देवाकडे वकील पाठविण्यासाठी आथेन्सच्या लोकांनी सरकारी गलबतें बांधिलीं होतीं. तीं फार पवित्र ससजत. इतर धार्मिक महोत्सवांच्या प्रसंगीही ह्या गलबतांचा उपयोग कर ण्यांत येई. मागें सांगितलेंच आहे कीं, डोरियन लोकांनी आथेन्सवर स्वारी केली, तेव्हां देवाकडून आलेला कौल राजा कोड्स ह्यास सांगण्यांत आला ; त्याबरहुकूम त्यानें जीव दिल्यावर पुढें नवीन राजा न नेमतां आर्कन ह्या हुद्याचा एक मुख्य अधिकारी नेमण्याची चाल आथीनियन लोकांनी पाडिली. अथेन्सचा राजवंश बंद पडला त्याची दंतकथा मूळ अशी आहे.

 आर्कनची नेमणूक तरी आरंभी वंशपरंपरा होती, ती सुमारें १६० वर्षे तशी चालली. पुढे कांहीं दिवस दरदहावर्षांनी नवीन आर्कन नेमावा असें ठरलें, असा प्रकार कांहीं दिवस चालल्यावर अल्पसत्ताक म्हणजे नऊ प्रधानांची राज्यव्यवस्था सुरू झाली ; म्हणजे राज्यांतील नऊ प्रमुख सरदारांच्या हातांत राज्यव्यवस्था देण्यांत आली. ह्या नवांत एक इसम मुख्यप्रधान, दुसरा मुख्य धर्माधिकारी आणि तिसरा सेनापति असे, बाकीचे सहा असामी राज्यांतील मुख्य. न्यायाधीश होते.

 ह्याप्रमाणे सर्व सत्ता राज्यांतील श्रीमंत व प्रमुख लोकांच्या हातांत गेल्यामुळे, रयतेचें नुकसान होऊ लागलें. हे सरदार लोक वाटेल ते कायदे करीत, व लोकांस पिळून काढीत. त्यांनी लोकांवर जबरदस्त कर वसविले, ते भरण्यासाठी लोकांस आपल्या जमिनी गहाण टाकणे किंवा जबर व्याजानें कर्ज काढणें भाग पडूं लागले. अशा कर्जात बुडून जाऊन त्यांच्या सर्व जमिनी जप्त झाल्या, व ते केवळ गुलाम होऊन बसले. कारण जो कोणी इसम कर्ज फेड ण्यास असमर्थ असेल, त्यानें धनकोच्या येथें गुलामगिरी किंवा मजुरी करून त्याचें कर्ज फेडले पाहिजे, असा कायदा होता. कित्येकांनी तर ह्या कर्जाचे पाय आपली मुलेंमाणसें सुद्धां विकलीं. अठरा वर्षा खालील मुलगे व अविवाहित मुली किंवा बहिणी विकण्याची प्रत्ये कास कायद्यानें मुभा होती. दारिद्र्यामुळे ते नाना प्रकारचे गुन्हे करूं लागले, व असे गुन्हे बंद करण्याकरितां अधिकाऱ्यांनी ज्यास्त कडक कायदे केले. असले कडक कायदे करणारा एक मुख्य गृहस्थ ड्रेको म्हणून होता. त्याचा स्वभाव अत्यंत बेफिकीर व कडक असल्या मुळे लोकांस कठोरपणाने वागवून त्यांस दावांत ठेवण्याचा त्याचा इरादा होता. आथेन्सचे पहिले कायदे ड्रेकोनेंच केलेले होते. बहुतेक गुन्ह्यांस मृत्यूचीच शिक्षा ठरविली असल्यामुळे, डेकोचे कायदे रक्तानें लिहिलेले आहेत, अशी सामान्यतः म्हण पडली होती.

 पण ह्याचा परिणाम चांगला झाला नाहीं. जिकडे तिकडे असंतोष माजला. सायलोन नांवाचा एक सरदार होता, त्यानें अशा संधींत बंड केलें. कांहीं सोबती जमवून त्यानें आथेन्सचा किल्ला काबीज केला, तेव्हां त्यास सरकारी फौजेनें वेढा घातला. पुढे किल्ला सरकारच्या हुस्तगत झाला, पण सायलोन पळून गेला, तो हाती लागला नाहीं,बाकीचे लोक आथिना देवीच्या देवळांत जाऊन लपून बसले. ' तुम्हांस सर्व गुन्हे माफ करून सोडून देऊं, ' असें त्या लोकांस वचन देऊन, देवळांतून बाहेर आणिलें, व विश्वासघातानें सर्वांस ठार मारिलें.

 ह्या विश्वासघातकी कृत्यानें आथेन्स येथें राज्यक्रान्ति झाली. सर्व लोक घाबरून गेले. वर सांगितलेल्या विश्वासघाताबद्दल देवी आपला काय सूड घेईल नकळे, अशी सर्वांस चिंता पडली. तेव्हां खऱ्या गुन्हेगारांस शिक्षा करून देवीचा राग शांत करण्यासाठी, तीनशें नगरवासी लोकांची एक सभा बसली. तिनें सर्व गुन्हेगारांस हद्दपार केलें. नंतर सोलन नांवाच्या गृहस्थानें आथेन्स येथें नवीन राज्यव्यवस्था व कायदे सुरू केले. हा प्रकार इ. स. पू. ५९४ ह्या वर्षी घडला, सोलन हा प्राचीन ग्रीक इतिहासांत मोठा शहाणा व सज्जन म्हणून नांवाजलेला आहे. त्यानें प्रथम गहाण पडलेल्या मिळकती सोडविण्याचा कायदा केला. कर्जदारांस गुलाम बनविण्याची मनाई करण्याचाही दुसरा एक कायदा त्यानें केला. मोठ्या खुबीनें त्यानें नाण्याची किंमत बदलली. ड्राक्मा म्हणून आथेन्सचें नाणें होतें. त्र्याहत्तर जुन्या ड्राक्मांची किंमत शंभर नवीन ड्राक्मा समजावी, असा ठराव करून, ७३ ड्राक्मा दिले म्हणजे शंभरांची फेड झाली असा ठराव त्यानें केला. राज्यव्यवस्थेत एक मोठा फरक त्यानें असा केला कीं, अमुक एक दौलत जवळ असणान्या सव लोकांस आर्कनची जागा मिळण्यास प्रतिबंध असू नये. ह्या सवलतीनें सरदार व सामान्य लोक यांजमधील भेद बहुतेक नाहींसे झाले, व लोकांच्या हातांत बरीच सत्ता आली. त्यामुळे श्रीमंतांचा गरिबांवर होणारा जुलूम पुष्कळ कमी झाला.

 पूर्वी राज्यांतील सर्व मोठमोठ्या जागा बड्या लोकांसच काय त्या मिळत असत. परंतु सोलनच्या कायद्यानें अमुक एक इस्टेट असणारे सर्व लोक सारख्या योग्यतेचे झाले. सोलननें सर्व सामान्य लोकांचे चार वर्ग केले. ज्या इसमाचें वार्षिक उत्पन्न पांचरों मापें किंवा ज्यास्त होतें, अशांचा पहिला वर्ग : मग हीं मानें धान्य, दारू किंवा अन्य पदा थांचों असली तरी हरकत नाहीं. दर एक मापाची किंमत एक ड्राक्मा समजावयाची. ह्या पहिल्या वर्गातील पाहिजे त्या इसमास आर्कन करण्यास हरकत नाहीं, असा सोलननें ठराव केला. दुसरा वग स्वारलोकांचा : ह्यांनीं युद्धोपयोगी असा निदान एक घोडा तरी जवळ बाळगिला पाहिजे, व पगार न घेतां लढण्यास आले पाहिजे, असा ठराव होता. तिसरा वर्ग लहान लहान जमिनींच्या मालकांचा ; ह्यांस पायदळ म्हणत ; व त्यांस स्वतःची हत्यारें बाळगावी लागत. चवथ्या वर्गात सर्व स्वतंत्र मजुरांचा समावेश असून, त्यांस जरी कोणतेंही सरकारी काम देतां येत नसे, तरी हरएक प्रकारच्या सार्वजनिक संस्थेस हजर राहणें, व आर्कन किंवा दुसन्या अधिका न्यांच्या नेमणुका करितांना मत देणें, हे हक्क त्यांस होते. पहिल्या तीन वर्गातील लोकांस कमी ज्यास्त प्रमाणानें सरकारास कर द्यावे लागत ; चवथ्या वर्गावर कोणताही कर नसे.

 फौजदारी दाव्यांचा निकाल करण्याकरितां एरिओपेगस नांवाचें एक कोर्ट सालेननें स्थापिलें, असें सांगतात. पण आथेन्स येथें मार्स हिल नांवाची एक टेंकडी आहे. तीवर सोलनच्या अगोदरपासून असलेले एक कोर्ट बसत असे. ( ह्याच ठिकाणीं सेंटपॉल ह्यानें आथी नियन लोकांस उपदेश केल्याचा उल्लेख बायबलांत आहे. ) तथापि पूर्वीच्या कोर्टात व त्याच्या अधिकारांत सोलन ह्यानें पुष्कळ नवीन फेरफार केले ह्यांत संशय नाहीं. ह्या कोर्टाच्या चौथऱ्याचे पडके भाग अजून आथेन्स येथें दृष्टीस पडतात.

 सोलननें एरिओपेगस कोर्टाच्या बाबतीत मुख्य फरक असा कला कीं, लोकांच्या नैतिक वर्तनावर देखरेख ठेवण्याचा कोटसि अधिकार दिला पाहिजे त्या वेळेस लोकांच्या घरांत शिरून त्यांचें आचरण शुद्ध आहे कीं नाहीं, व ते विनाकारण पैसा उधळितात की काय, हे पाहण्याचा न्यायाधीशांस अधिकार दिला. त्यांच्या दृष्टीस कांहीं गैरशिस्त प्रकार पडल्यास, त्याबद्दल दंड किंवा अन्य शिक्षा करण्याचा त्यांस अधिकार होता. म्हणून ह्या एरिओपेगसच्या अधि कायांस सर्व लोक भीत असत. त्यांच्या समोर कोणी हंसत नसे. लोकांवर कर बसविण्याचें काम ह्यांजकडेच असल्यामुळे प्रत्येक इसमास आपली जमीन, जिंदगी व उत्पन्न ह्यांजबद्दलची कच्ची इकीगत ह्या कोर्टाकडे जाहीर करावी लागे.

 सोलननें एकंदर दहा न्यायकोर्टें स्थापिलीं ; व प्रत्येक कोर्टातील कजे ऐकण्यास सहाशें इसमांची जरी नेमून दिली. परदेशांतील कारा गीर लोक आपल्या राज्यांत आणून त्यांजकडून अनेक उद्योग धंदे सुरू केले. आथेन्सची लढाऊ गलबतेंही ह्यानेंच बांधिलीं. त्याजबद्दल असा नियम केला कीं, वर सांगितलेल्या चार वर्गीपैकीं प्रत्येक वर्गानें बारा जहाजें लढाईस सज करून दिली पाहिजेत, आणि तसेंच अमुक एक उत्पन्न असणाऱ्या वाटेल त्या इसमास जहाजाचा कप्तान नेमावें, व त्याजबद्दल एक वर्षाचा सर्व खर्च ज्याचा त्यानें सोसावा. अशा इसमांस ट्रायरास (Trierarchs) असें म्हणत.

 ह्याशिवाय मध्यम वर्गातील लोकांची स्थिति सुधारण्याकरितां सोलननें आणखी अनेक कायदे केले, व बड्या लोकांचा जुलूम बंद केला. परंतु त्यानें केलेल्या सर्वच गोष्टी लोकांस पसंत पडल्या असें नाहीं. म्हणून देशपर्यटन आणि ग्रंथलेखन हीं. कामें पत्करून, त्यासाठी तो आथेन्स सोडून निघून गेला. त्याचे कायदे लांकडी तक्त्यांवर खोदलेले असत. हे तक्ते आंसावर फिरते ठेवून, ते प्रथम किल्ल्यांत व मागाहून सार्वजनिक सभागृहांत ठेवण्यांत आले.


प्रकरण चौथे  - स्पार्टाचे राज्य

 कॉरिंथच्या आखातानें ग्रीस देशाचे दोन भाग झाले आहेत. त्यांतील दक्षिणभागाच्या अगर्दी दक्षिणच्या टोंकास लॅकोनिया असें म्हणतात. ह्या लॅकोनिया प्रांतात स्पार्टी शहर आहे. प्राचीन काळी डोरियन लोकांनी हा प्रांत जिंकिला, व त्यास लॅसिडीमन असें नांव दिलें. हळू हळू ह्या डोरियन लोकांनी आजूबाजूस आपला अंमल वाढविला ; व जिंकलेल्या लोकांवर खंडणी बसविली. डोरियन लोक मूळच्या रहिवाश्यांस आपले ताबेदार समजत ; व आपणांस ते स्पार्टन्स व लॅसिडिमोनियन्स असे म्हणं लागले. जिंकलेल्या लोकांस लॅकोनियन्स हें नांव प्राप्त झालें. ह्या दोन लोकांत बेटीव्यवहार बंद होता. जिंकले. ल्यांस आपल्याबरोबरीचे हक्क त्यांनीं कधींच दिले नाहींत, म्हणून ह्या उभयतांमधील भेद पुष्कळ शतकें कायम राहिला. जिंकलेल्या लोकांस राज्यप्रकरण कोणतेही हक्क नव्हते, व त्यांस राज्यांत नोकप्याही मिळत नसत. त्यांची कामें फक्त व्यापार व शेती ह्रीं होतीं. स्पार्टन लोक आपणास लढवय्ये समजत असल्यामुळे, व्यापार व शेती ही कामें त्यांस हलकीं वाटत असत.

 ह्या दोन जातींशिवाय स्पार्टा संस्थानांत हेलॉट नांवाचे गुलांमा सारखे पुष्कळ लोक होते. त्यांस जमिनी दिल्या असून, त्या ते नांगरीत व त्यांचा क्रयविक्रय करीत. जमिनीचा मालक निराळाच असे ; पण त्याची ह्या गुलामांवर संपूर्ण सत्ता नसे. हे हेलॉट गुलाम सरकारच्या मालकीचे म्हणून समजले जात, व त्यांस गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम सरकारचें असे. त्यांची मूळउत्पत्ति माहीत नाहीं ; परंतु बहुधा ते देशांतले मूळचे रहिवाशी असून, त्या वेळच्या जमीनदारांचे नोकर बनले असावे. स्पार्टन लोकांनी त्यांजवर नाना तऱ्हेचे जुलूम केल्यामुळे, व अनेक वेळां त्यांनी शेंकडों लोकांची कत्तल उडविल्यामुळे, त्यांची स्थिति अगदी शोचनीय झाली होती. त्यांनी आपल्या सत्तेविरुद्ध ब्र काढू नये असा स्पार्टन लोकांनी बंदोबस्त ठेविला होता, असे सांगतात की, एका प्रसंग दोन हजार हेलॉट लोकांस स्पार्टन लोकांनी मेजवानीस बोलाविलें, व विश्वास घातानें सर्वस कापून काढिलें हेलॉट लोकांची कित्येक कुटुंबें आपल्या शेतांवर घरें करून राहत, व कित्येक लोक स्पार्टनलोकांच्या घरीं काबाडकष्ट करीत. युद्धप्रसंगी प्रत्येक स्पार्टन गृहस्थ आपल्या. बरोबर सात असामी हेलॉट गुलाम घेत असे. स्पार्टन पायदळाप्रमाणें ह्या हेलॉट लोकांना अवजड शिरस्त्राणें व चिलखतें दिलेलीं नस ल्यामुळे, त्यांचा उपयोग हलक्या फौजेसारखा करण्यांत येत असे.

 स्पार्टाची राज्यव्यवस्था इतर सर्व ग्रीक संस्थानांहून अगदी भिन्न होती. स्पार्टा येथें नेहमीं दोन राजे राज्यावर असत. दोघांचेही अधिकार सारखे होते. ह्या दोहोंपैकी कोणीही मरण पावला, तर त्याच्या जागी त्याचा मुलगा किंवा दुसरा नजीकचा हकदार असेल त्यास राज्यपद मिळे. ह्या दोन राजांविषयीं एक दंतकथा अशी आहे, कीं स्पाटा देश जिंकून तेथील राज्य स्थापन करणारा हर्क्युलीस म्हणून मूळपुरुष झाला, त्याचा मुलगा अरिस्टोडिमस ( Aristodemus ) ह्या शूर पुरुषानें कांहीं वर्षे राज्य केल्यावर मरण समयीं त्यानें आपलें राज्य यूरिस्थेनिस (Euresthenes) व प्रॉक्लीस (Procles) ह्या दोन मुलांस दिलें, व दोघेही एकाच वेळीं राज्य करूं लागले, त्या वेळेपासून स्पार्टा येथें दोन राजे असावे असा प्रघात पडला. ही गोष्ट केवळ काल्पनिक दिसते. तरी पण दोन राजांची उत्पत्ति अशाच कांहीं तरी कारणानें किंवा जुळ्या बंधूंमुळे झाली असावी. कदाचित् दोन सरदारांनी प्रथम है राज्य जिंकल्यामुळे दोघांनीही त्यांचा कारभार करावा असा ठराव झाला असेल.

 इ. स. पूर्वीच्या नवव्या शतकापावेतों स्पार्टाचा इतिहास विशेष उपलब्ध नाहीं. नवव्या शतकाच्या सुमारास लायकरगस नांवाचा एक पुरुष स्पार्टा येथे झाला, त्यानें तेथें नवीन कायदे तयार केले. पुतण्या चरिलॉस ( Charilaus ) हा लहान वयाचा असल्या मुळे, त्याच्या नांवानें लायकरगस राज्यकारभार पाहत असे. त्यानें केलेल्या सर्व कायद्यांचें धोरण एकच होतें. जिंकलेल्या लोकांनी स्पार्टन लोकांविरुद्ध आपले डोकें कधीही वर काढू नये ; स्पार्टन लोकांनी नेहमीं युद्धास सिद्ध असावें ; त्यांची शरीरें कणखर व मजबूद व्हावीं, आणीबाणीच्या प्रसंगी न डगमगतां स्वराज्यसंरक्षणासाठी वाटेल तो स्वार्थत्याग त्यांनी करावा, व बायकांमुलांचाही पर्वा न करितां आपल्या लोकांचें राज्य राखावें ; असा लायकरगसच्या कायद्यांचा हेतु होता. लायकरगसच्या नियमांनीं स्पार्टन लोक शूर व धाडशी झाले, ही गोष्ट खरी, तरी पण त्यामुळे त्यांचा स्वभावदी क्रूर व निर्दय बनला. त्यांस गृहसौख्याचा तिटकारा उत्पन्न झाला, व कुटुंबास एकत्र करणारी सामाजिक बंधनें नाहींशी झाली.

 लायकरगसनें मुलांचीं संगोपनगृहें स्थापन केली. कोणताही स्पार्टन मुलगा सात वर्षांचा झाला कीं, सरकार तो आईबापांपासून काढून ह्या गृहांत आणी. या ठिकाणी त्याजकडून सर्व प्रकारचे व्यायाम करवून त्याचे अवयव मजबूत करीत. अशा प्रकारें लोकांस शूर, धीट, व तरतरीत बनवीत. त्यांच्या अंगावर एकच आंखूंड असें लहान वस्त्र असे. तें ते अंगाभोवती गुंडाळीत अवघड ठिकाणी अनवाणी फिरणें, पळणें, उड्या मारणें, झाडावर चढणें, इत्यादि गोष्टी त्या मुलांस शिकवीत, त्यांस अन्नही जाडेंभरडेंच देत. गवत गोळा करून त्यावर ते निजत ; व कधींकधीं आजूबाजूच्या शेतांतून चोरी करण्यासही त्यांस शिकवीत असत. वास्तविक हें शिक्षण चांगलें नव्हे ; पण शत्रूच्या मुलखांत आपला बचाव कसा करावा, हें लोकांस शिकविण्याचा शिक्षणाचा रोख होता. आपल्या राज्यकर्त्यांची आज्ञा पाळून त्यांस सन्मान देणें, फाजील भाषण न करणें, होईल तितक्या थोड्या शब्दांनीं आपला मनोदय बाहेर कळविणें, इत्यादि गोष्टींचा सुद्धां त्यांजकडून अभ्यास करविण्यांत येत असे. इंग्रजी भाषेत ‘ लॅकॉनिक : भाषण हा शब्द स्पार्टन लोकांच्या ह्या रीतीसूपान प्रचारांत आला आहे.

 अठरा वर्षांचें वय झालें, म्हणजे मुलगे आपल्या बापांबरोबर सार्वजनिक भोजनगृहांत जात. तेथें मेजांजवळ उभे राहून वडिलांस वाढण्याचें काम त्यांस करावें लागे. वीस वर्षांचें वय झालें म्हणजे, त्यांस फौजेंत दाखल करून सरहद्दीच्या रक्षणावर पाठवीत. तेथून दहा वर्षांनी परत आल्यावर त्यांस सरकारनोकरींत दाखल करीत, किंवा फौजेंत अंमलदारांच्या जागा देत. इतकें होईल तेव्हांच मग सार्वजनिक भोजनगृहांत पंक्तीस बसून जेवण्याची त्यांस परवानगी मिळे. लोकांनीं घरीं ऐषआराम करूं नये, म्हणून सरकारानें मुद्दाम असलीं भोजन गृहें काढिलीं होतीं. हा प्रघात पूर्वी क्रीट बेटांत होता, तेथून तो स्पार्टन लोकांनी उचलला. भोजनासाठी मोठे हॉल बांधलेले असते. तेथें जवसाचें पीठ, दारू, अंजीर व पनीर ( म्ह चीज्ञ ) वगैरे भोजनाचे जिन्नस प्रत्येक शेतकन्यास पाठवावे लागत. कांही लोक जेव्हां जनावरांचा बळी देत, तेव्हां त्या बळीचा कांहीं भाग ह्या भोजनगृहांत त्यांस पाठवावा लागे. सरकारानें जंगलें राखलेली असून, त्यांतील शिकार पकडून ह्या ठिकाणी आणीत. पुढे पुढें तर मीठमसाल्या साठी सुद्धां प्रत्येक असामीवर कांहीं थोडा आकार बसविण्यांत आला. कोणीही इसम, मग तो राजा असो कीं रंक असो, त्यास ह्या सार्वजनिक ग्रहांतच भोजनास यावें लागे ; व आपापल्या हिशाचा आकार देणें त्यास प्राप्त असे.

 भोजनाप्रमाणेंच शयनगृहेंही सरकारी असत. त्या ठिकाणीं सर्व स्पार्टन लोकांस निजण्यास जावें लागे. ह्याप्रमाणे वयाचीं साठ वर्षे झालीं, की लष्करी नोकरी संपली. मध्यंतरी युद्धप्रसंग नसून सत सांपडल्यास, त्या फुरसतत कवाइती व शिकार हे धंदे चालत. साठवर्षानंतरचें आयुष्य सरकारची इतर बैठी नोकरी करण्यांत, किंवा लहानांचा सांभाळ करण्यांत खर्च करावें, असा नियम होता. अगदीं वृद्धापकाळ आला, म्हणजे समवयस्क लोक एकत्र जमून गोष्टी करून आपला काळ घालवीत. अशा प्रकारची सार्वजनिक भेटीचीं रहें प्रत्येक ग्रीक शहरांत बांधलेलीं होतीं. स्पार्टामध्ये मात्र त्या गृहांचा उपयोग फक्त वृद्ध झालेल्या सैनिकांस करूं देत असत.    

 स्पार्टन लोकांच्या बायका व मुलींकरितां अशी सार्वजनिक व्यवस्था नव्हती ; त्या आपापल्या घरींच राहत, तरी पण त्यांचें शिक्षणही पुरुषांसारखेच कठोर असे. लहानपणी त्यांस तालमेंत व्यायाम करावा लागे. कोणत्याही प्रकारचें सौख्य किंवा आमत्यांस घेऊं देत नसत. पुरुषांप्रमाणेच बायकाही फक्त एक वस्त्र नेसून राहत.     स्पार्टन राजांच्या हातांत अधिकार फारच थोडा असे. साठ वर्षाच्या अढावीस बड्या गृहस्थांची एक सभा नेमलेली असन, तिच्या हातांत सर्व कारभार असे. ह्या सभेचें अध्यक्षस्थान राजांकडे असे व कधीं कधीं धर्माध्यक्ष व सेनापति ह्यांसही अध्यक्ष नेमीत असत.    

 स्पार्टा येथें व डोरियन लोकांच्या इतर सर्व शहरांत, ईफोर नांवाचे सरकारी तपासनीस असत. ते लोकांचें शिक्षण व वर्तन ह्यांवर देखरेख ठेवीत. युद्धप्रसंगी दोनही राजे वारंवार बाहेर जाऊं लागल्यामुळे, राज्याचा सर्व कारभार ह्या तपासनिसांच्याच हातांत गेला. वृद्धमंत्रिसभा व सामान्य लोक ह्यांजमध्ये शिष्टाई करण्याचा त्यांनीं आव घातल्यामुळे, त्यांच्या सर्व सूचना पास होत गेल्या, म्हणून त्यांची सत्ता वाढली. असें होतां होतां राज्यांत त्यांच्या शिवाय पान हालेनासें झालें.    

 इकडे स्पार्टीची सत्ताही हळूहळू फारच वाढली. शेजारच्या राजांस स्पार्टाचा मोठा धाक वाटू लागला. लॅकोनियाला लागूनच नैर्ऋत्येस मेसेनिया म्हणून एक प्रांत होता, त्यांतील लोकांस स्पार्टन लोकांनी जिंकून आपल्या अंमलाखाली आणिलें, मेसेनियन लोक तरी कांहीं कमी नव्हते. प्रसंग पडला कीं तेही स्पार्टन लोकां बरोबर दोन हात करीत असत. पुढे त्या दोघांमध्यें युद्धप्रसंग होऊन मेसेनियन लोक जिंकले गेले. हें युद्ध चालू असतां अनेक शहरें धुळीस मिळालीं ; देश उद्धस्त झाला आणि हजारों लोक तलवारीखाली कापले गेले. ह्याप्रमाणें चाळीस वर्षेपावेतों मेसेनियन लोक स्पार्टीच्या ताब्यांत राहिले. इ. स. पू. ६८५ ह्या वर्षी आरि स्टोमिनिस म्हणून मेसेनियाचा एक शूर देशभक्त स्वातंत्र्यासाठीं स्पार्टन लोकांशी लढण्यास पुढे आला. त्यानें सर्व मेसेनियन लोकांस धीर देऊन युद्धास सिद्ध केलें ; व अनेक पराक्रम करून स्पार्टन लोकांस पुष्कळ दमविलें. एके दिवशी रात्रीं तो एकटाच स्पार्टी शहरांत शिरला. शहरास तटबंदी नव्हती. तेथें मिनी देवीच्या देवळांत जाऊन तिच्या अंगास एक ढाल त्यानें खिळवून दिली ; व ' स्पार्टन लोकांपासून मिळविलेल्या लुटीपैकी ही ढाल मीं देवीस अर्पण केली आहे, असा लेख तेथें लिहून ठेविला.  सकाळी स्पार्टन लोकांनी ती ढाल पाहिली तेव्हां ते घाबरून गेले. त्यांस असे वाटलें कीं, देवी आपणांस सोडून मेसेनियन लोकांवर कृपादृष्टि करीत आहे.    

 ह्या युद्धांत घडलेल्या अनेक चित्तवेधक गोष्टी लोकांत सांगण्यांत येतात. एक गोष्ट अशी आहे कीं, टिर्टियस नांवाचा ॲटिका प्रांतांतला एक गृहस्थ होता. तो मूळचा पंतोजी असून शिवाय शूर प्रसंगांचीं कवनें करून लोकांस म्हणून दाखवीत असे, डेल्फाय येथील कौलावरून असे जाहीर झालें होतें कीं, स्पार्टन लोकांस एखादा आथेन्सचा योद्धा सामील झाल्याशिवाय जय मिळावयाचा नाहीं. ह्या कौलास अनुसरून स्पार्टन लोकांनीं आथेन्सकडे विनंती केली कीं, आपणांस एक उत्कृष्ट योद्धा पाठवून द्यावा. आर्कनच्या मनांत स्पार्टाला मदत करावी असे नव्हते. तथापि अपॉलो रुष्ट होईल ह्या भीतीनें आथेन्सच्या लोकांनी टिर्टियस यास स्पार्टा येथें पाठवून दिलें, टिर्टियस लंगडा असून त्यास युद्धकलेची माहिती नव्हती ; तेव्हां त्याच्या हातून विशेष कांहीं पराक्रम घडेल असें आथेन्सच्या लोकांस वाटलें नाहीं. कोणतीही कथा घेतली तरी डेल्फाय येथील अपलोचें भाकीत खरें ठरलेच पाहिजे, अशा आथेन्सच्या सर्व दंतकथा आहेत. त्याचप्रमाणे टिर्टियस ह्याच्या कवनांनीं व वीर्योत्पा दक गाण्यांनीं स्पार्टन फौजेस त्वेष येऊन, त्यांनी भेसेनियन लोकांस पुनरपि जिंकून टाकिलें.    

 टिर्टियस यास स्पार्टा येथें कसा मान मिळत असे तें कळत नाहीं. तथापि त्याचीं कवनें स्पार्टन लोकांस फार आवडत ; व प्रत्येक शिपाई रात्रीं भोजन झाल्यावर तीं मोठ्या भक्तीनें म्हणत असे. स्पार्टन व मेसेनियन लोकांचें हें युद्ध सतरा वर्षे चाललें, अखेरीस मेसेोनिया प्रांत स्पाटीच्या कवजांत आला. स्पाटीच्या ताब्यांतील आर्केडिया प्रांतांत कारी येथे डायाना देवीचा उत्सव दरसाल होत असे. त्या उत्सवांतून एकदां मेसोनियन लोकांनी कित्येक स्पार्टन मुली पळवून नेल्या. पण त्यांचा सरदार ॲरिस्टोमिनिस ह्यानें स्पार्टन लोकांपासून योग्य दंड घेऊन, त्या मुली त्यांच्या त्यांस परत दिल्या. अशा अनेक आख्यायिका ह्या युद्धांतल्या प्रचलित आहेत. अॅरिस्टोमिनिस ह्याचा शेवटीं उपाय हरला. तो मेसेनिया सोडून व्होड्स बेटांत जाऊन तेथेंच आमरण राहिला. मेसेनियन लोक त्यास फार पूज्य मानीत असत. त्याच्यावर अनेक कविता व आख्यानें केलेली असून, त्यांवरून व टिर्टियस ह्याच्या कवनांतून ह्या मेसेनियन युद्धाची हकीगत उपलब्ध झाली आहे.

 मेसेनिया जिंकल्यापासून स्पार्टा येथें अनेक घडामोडी झाल्या. अनेक स्पार्टन लोक युद्धांत मरण पावल्यामुळे, त्यांचे हक्क पुष्कळ लॅकोनियन लोकांस देण्यांत आले ; तसेंच युद्धांत मरण पावलेल्यां लोकांच्या विधवांशी लग्न करण्याची त्यांस परवानगी मिळाली. त्यामुळे कित्येक कुटुंबें कुलभ्रष्ट झालीं ; व ज्यांनी दुसऱ्या जातीच्या लोकांशीं लग्नें केलीं नाहींत, ते आपणास पवित्र समजूं लागले, आरंभ सर्व स्पार्टन लोक सारख्या दर्जाचे होते ; पण मेसेनियां जिंकल्यावर त्यांजमध्यें उच्चनीच भाव शिरला. ह्या वरील युद्धांत स्पार्टन लोकांस कॉरिंथची मदत होती. आथेन्सचें आरमार सोलन ह्यानें सुधारण्यापूर्वी, आरमाराच्या बाबतींत कॉरिंथचा पगडा सर्व ग्रीस देशावर होता. मेसेनियन युद्धाच्या वेळेस कॉरिंथच्या सरकारानें गलबतें बांधण्याच्या कामांत फारच सुधारणा केली. ते मोठमोठीं विस्तृत व उंच गलबतें बांधू लागले ; त्यांवर वल्ह्यांच्या तीन तीन रांगा असत. जुन्या गलबतांना फक्त एकच रांग असे. म्हणून ह्या नवीन गलबतांस ट्रायरीम, म्हणजे तीन रांगांची गलबतें, अरे नांव मिळालें. पुढें ज्यास्त रांगांची गलबतें बांधण्यांत आली त्यांसही चार रांगांची, पांच रांगांची, अर्शी नांवें पडत गेलीं.


प्रकरण पांचवे  - इ.स.पू  सहाव्या शतकांतील ग्रीक लोकांची रीतीभाती

  ह्या वेळी ग्रीक लोकांची सुधारणा विशेषशी झाली नव्हती. आथेन्स शहर विद्येचें माहेरघर, व कॉरिन्थ शिल्पादि कलांचें आदि स्थान शालें, तें ह्यापुढे पुष्कळ काळानें झालें, तथापि होमरच्या काळी ग्रीक लोकांची स्थिति होती, त्याहून ते ह्या वेळेस बरेच सुधारलेले होते. लोकांच्या रीतीभाती व एकंदर देशाचा नूर होम रच्या वेळेपासून पुष्कळ पालटला होता. त्यांची शहरें पुष्कळ सुरेख झाली. लोक विटांचीं व दगडांची घरे बांधू लागले, व छप रांवर कौलें घालूं लागले ; तसेंच आंत ऐसपैस जागा करून चांगलें सामानसुमान ठेवूं लागले, जमिनीस दगडाची फरशी करून, भिंतीस पांढरा रंग लावूं लागले ; तरी चित्रविचित्र रंग देऊन घरांस शोभा आणणें त्यास ह्या वेळीं ठाऊक नव्हतें. घरांतील खोल्यांचे दोन पृथक् भाग असतः एक पुरुषांसाठीं व दुसरा बायकांसाठी. त्या वेळी आपल्याइकडील रिवाजाप्रमाणें स्त्रिया पुरुषांपासून अलग राहत. स्त्रियांस विशेष सन्मान देण्याचा प्रघात नव्हता. नवरा आपल्या बायकोस सहचारिणी समजे, पण आपल्याहून तिची योग्यता तो कमी मानी. कुटुंबाची देखरेख एवढेंच स्त्रियांचें काम असे. म्हणून स्त्रियांस शिक्षण देऊन त्यांचे मन सुसंस्कृत करण्याची चाल नव्हती. त्या सर्वथैव अशिक्षितच असत.

 परपुरुषास भेटण्याची तरुण स्त्रियांना मनाई असे. फक्त बाप आणि भाऊ ह्यांस भेटण्यास हरकत नव्हती. तथापि मोठमोठ्या समारंभ प्रसंगी पुरुषांच्या मेळ्यांत बायका बाहेर येत असत. अशा मेळ्यांच्या प्रसंगी तरुण पुरुष आपल्या बायका पसंत करीत. मुलीच्या आई-बापास वर पसंत पडला तर त्याचा विवाह होत असे. त्यांत मुलीची पसंती मात्र कोणी विचारीत नसे. स्पार्टा प्रांतांत स्त्रियांस ज्यास्त मोकळीक होती. तेथें तरुण मुलींना पडदा नसन स्वतंत्रपणें फिर ण्याची मुभा असे, व त्या सार्वजनिक खेळांत उघडपणे बाहेर येत. तथापि स्पार्टीत सुद्धां विवाहित स्त्रियांना बाहेर पडण्याची मोकळीक नव्हती ; अविवाहित मात्र बाहेर पडत.

 आथेन्सच्या लोकांस इतर संस्थानांतील स्त्रियांशी लग्न करण्याची मनाई होती. लग्नें एकाच कुटुंबांत जुळविण्यांत येत ; कारण एका कुटुंबांतील मुलीनें परक्या कुटुंबांतील पुरुषाशी लग्न केल्यास, तिळा स्वतःच्या हक्कानें प्राप्त झालेली मिळकत नवन्याचे कुटुंबांत जाण्याचा संभव होता. अशा प्रकारें एका कुटुंबाची मिळकत दुसन्या कुटुं वांत जाऊं नये, म्हणून मुलीला जवळच्या नातेवाइकाशीं लग्न लावर्णे भाग पडे ; मात्र तो इसम तिच्याशी लग्न लावण्यास खुषी नसेल तर, तिच्याशी लग्न लावण्याचा हक्क दुसऱ्या नजीकच्या पुरुषास प्राप्त होई. हा कायदा इतका कडक असे कीं, एखाद्या स्त्रीचें एकवार लग्न झाल्यावरही, जर जवळचा नातेवाईक तिच्याशी लग्न करण्याचा हक्क सांगू लागला, तर पहिल्या नयन्यास ती आपली बायको व तिची संपत्ति खन्या हक्कदारास द्यावी लागे.

 कुटुंबांतील संपत्ति सर्व मुलांस सारखी विभागून मिळे ; मात्र त्यांत बहिणी असल्यास, त्यांचा लग्नखर्च करणे व त्यांचें लग्न जवळच्या नातेवाइकांशीं जुळवून देणें, ह्या गोष्टी त्या भावांस कराव्या लागत. एखादी मुलगी लहानपणापासून पोरकी असून तिला भाऊ नसले व तिजपाशीं द्रव्य नसले तर, तिचा जो कोणी जवळचा नातेवाईक असे, त्यानें स्वतः तिच्याशी लग्न लावावें, अगर तिचा हुंडा भरून तिला नवरा पाहून द्यावा, असा कायदा होता. ही हुंडा देण्याची चाल लायकरगस ह्यानें स्पार्टातून अजीबात काढून टाकिली. त्यामुळे मुलगी कितीही गरीब असली, तरी तिचें लग्न होण्याची अडचण पडत नसे, ग्रीक लोकांत विवाहविधि असा होता कीं, वधूवरांचे नाते वाईक एकत्र जमवून, त्या ठिकाणी चधूवरांच्या देखत लग्नाचा ठराव होई, त्यांतच हुंडा व मुहूर्त ह्यांचा निश्चय होत असे. लग्नाच्या दिवशी सकाळीं होमहवन व धर्मविधि होऊन, संध्याकाळीं वराची स्वारी वधूच्या घरीं तिला घेण्याकरितां येई. नंतर वरात निघे. त्यांत वधूस सुंदर शालू नेसवीत. चित्रविचित्र रंगांचा सुंदर पोषाख असे. वराच्या अंगावरही उभयतांच्या मस्तकांवर शोभिवंत पुष्पमालांचे मुगुट असत. वधूस एका सुंदर रथांत बसवून, तिच्या एका बाजूस वर, व दुसऱ्या बाजूस वधूचे नातेवाईक बसत. वरातीच्या पुढें सुस्वर तालांत वाद्ये वाजवून देवतांचीं स्तोत्रें म्हणत. गृहप्रवेशाचें द्वार लतापल्लवांच्या गुच्छांनीं शंगारलेले असून, तेथें वधूवरांचा प्रवेश होतांच त्यांजपुढें जमिनीवर मिठाई टाकीत. तदनंतर भेजवानी होऊन समारंभ पुरा होई. दुसऱ्या दिवशी स्नेही मंडळीकडून नजरनजराण येत, व कुटुंबाच्या नांवनिशींत वधूचें नांव लिहिण्यांत येई.

 मुलाचा जन्म झाल्यावरही तत्प्रीत्यर्थ त्याचे आईबाप एक माठा समारंभ करीत, व आपल्याकडील बाळंतविड्यांप्रमाणे कुटुंबाच्या हितचिंतकांकडून मुलास भेटी येत. मुलगा झालेला असला तर घराला ऑलिव्ह नामक वृक्षांच्या शाखांनीं शृंगार करीत, व मुलगी झाली असली तर तो शंगार लोकरीचा करीत. संध्याकाळी एक मेजवानी होई. त्या प्रसंग होमशाळेत अग्नीची पूजा करून, जन्म लेल्या मुलास हातांत घेऊन दाई त्या अग्नीस प्रदक्षिणा घाली ; व त्याच वेळी मुलाचें नांव ठेवीत. हें मूल ह्या कुटुंबांतून देवास अर्पण करण्यांत येत आहे, असा ह्या विधीचा अर्थ होता. हा विधि यथासांग झाला ह्याची साक्ष ठेवण्याकरितां, जमलेले सर्व गृहस्थ त्या होमास प्रदक्षिणा घालीत. मुलाचें फक्त एकच नांव ठेवण्यांत येई. ख्रिस्ती लोकांत अनेक नांवें ठेवण्याची चाल आहे, ती ग्रीक लोकांत नव्हती. तें नांव बाप आपल्या पसंतीनें ठेवी ; व पुढे कधीं तें फिरवून दुसरें नांव ठेवावेंसें वाटल्यास बापास तसें करतां येत असे.

 ग्रीक लोक प्रेतें पुरीत असत. प्रेतसंस्काराचा विधि महत्वाचा असे. मनुष्य मेल्यावर तिसन्या दिवशीं सूर्योदयाचे अगोदर हा विधि करीत. उघड्या तिरडीवर प्रेत शुभ्र वस्त्रानें गुंडाळून तें स्मशानांत नेत. प्रेताच्या मस्तकावर फुलांचे गुच्छ घातलेले असत. पुरुष असत ते प्रेताच्या पुढें चालत व बायका मागें चालत ; शिवाय वाजंत्रीं वाजवून शोकदर्शक भजन म्हणण्याकरितां मुद्दाम बोलवून आणलेले पुष्कळ लोक स्मशानयात्रेबरोबर असत. कधीं कधीं ग्रीक लोक प्रेतें चितेवर जाळीत ; व त्यांची रक्षा एका भांड्यांत भरून त्यावर थडगीं बांधीत. तसेंच प्रेतें पुरतांना तीं ते एका मातीच्या पेटींत घालून त्यांचें तोंड पूर्वेकडे करून पुरीत. थडग बहुधा शह राच्या वेशीजवळ रस्त्याचे बाजूस असत, सुतकाचा पोषात्र काळा असून तें एक महिनाभर पाळीत त्या महिन्यांत कुटुंबांतील माणसें एकांतांत राहत ; बाहेर समाजांत येत नसत.

 ह्या वेळचा ग्रीक लोकांचा पोषाख पहिल्यासारखाच होता ; त्यांत विशेष फरक झाला नव्हता. अथेन्स व दुसऱ्या कित्येक शहरांतील उंच प्रतीचे लोक बाह्यांचा लांब अंगरखा अंगांत घालून त्यावर धोतर लपेटून घेत. पण सर्वसामान्य पोषाख म्हणजे आंखूड बिन हाताचें जाकिट असे ; त्यास चिटन असें नांव आहे. पुरुषांचें मुख्य वस्त्र धोतर असे. बायका शालू नेसत, ते पुरुषांच्याहून मोठे लांबलचक व बारीक असत. त्यांवर कधीं कधीं कशीद्याचें किंवा जरीचें काम केलेलें असे. तसेंच बायकांचीं जाकिटें सुंदर पातळ वस्त्राचीं असून, त्यास कोंपरापर्यंत बाह्या असत ; म्हणजे त्या एक प्रकारच्या आपल्याकडील चोळ्याच होत असें म्हणण्यास हरकत नाहीं.

 वस्त्रे विणण्याची कला ग्रीक लोकांस पूर्वीपासून येत होती. प्रत्येक कुटुंबांत माग असे ; त्यावर कुटुंबास पुरे इतकें कापड ते गुलामां कडून विणवून घे. तसेंच सुटी लोकर सारखी दाबून बुरणुसा सारखें कापड करणें त्यांस ठाऊक होतें. अशा प्रकारच्या दाबीव लोकरीच्या बुरणुसाच्या टोप्या प्रवासी लोक, गुराखी, व शेतकरी वापरीत असत.

 ग्रीक लोक आपल्या जमिनी वर्षांतून तीन वेळ नांगरीत. त्यांचे नांगर अनेक तऱ्हेचे पण साधे असत, शेतावरच एक उंचवट्यावर खळी करून त्यांत ते सर्व धान्य मळीत धान्य मळण्याचें काम केव्हां केव्हां यंत्रानें करीत, व केव्हां केव्हां गुरांच्या पायांखाली मळीत. धान्य दळणें तें दगडी उखळांत कुटून बारीक करीत, किंवा दगडी जांतींही त्यांजपाशीं असत. ह्या जांत्यांवर दळण्याचें काम स्त्रीजातीच्या गुलामांकडून करवीत.

 अँटिका प्रांताची जमीन गव्हाच्या पिकास योग्य नव्हती. व्यापार मुख्यतः धान्यांचा चाले, व त्यापासन सरकारसायाची बरीच प्राप्ति होई. धान्यसंबंधी कायदे मोठे कडक असत. धान्यविक्रीचे दर सरकार ठरवी. त्या दरांहून महाग दरानें धान्य विकून ज्यास्त फायदा व्यापाऱ्यांनी केल्यास, त्यांस मरणाची शिक्षा होत असे. अँटिका प्रांतांत जेवढें धान्य उत्पन्न होई, तेवढे सर्व आथेन्स येथेंच आणून विकावें लागे ; व परदेशाहून आणलेल्या धान्यापैकी निदान दोन - तृतीयां शाची विक्री आथेन्स येथेंच करावी, असा कायदा होता. अॅटिकांतले उत्पन्नाचे मुख्य जिन्नस तेल आणि दारू हे असत. द्राक्षांचे मळे व ऑलिव्ह नांवाच्या तेलफळाचीं शेतें ह्यांनी सर्व प्रांत भरलेला असे. बागाईत त्वांस ठाऊक नव्हतें ; तसेंच सुंदर बागा करण्याची त्यांस माहिती नव्हती. मात्र सार्वजनिक उत्सवप्रसंग पुष्प माळा करण्यासाठी गुलाब, कमळे व इतर सुवासिक फुलझाडें ते लावीत असत.

 अॅपॅटयूरिया नांवाचा एक उत्सव दरसाल आथेन्स येथे होत असे. वर्षांत जन्मलेल्या सर्व मुलांस नागरिकत्वाचे हक्क देण्यासाठीं हा उत्सव करीत. तो तीन दिवस चाले. पहिल्या दिवशीं सर्व लोक एकत्र जमून सायंकाळीं ग्रामभोजन घालीत. दुसऱ्या दिवशीं मंदिरांत जाऊन बळी वगैरे देत. तिसन्या दिवशीं सर्व भाईबंद ( गोत्रज ) एकत्र जमत. तेथें बाप आपले नवीन मूल हातांत घेऊन आपल्या गोत्रजांपुढे आणी ; व ' ह्यास नागरिकाचे स्वातंत्र्य देण्यास हरकत आहे काय ? असा प्रश्न विचारी, त्यावर कोणी हरकत घेतली नाही तर त्या मुलाचें नांव नागरिकांच्या पटांत दाखल करीत. तसेंच कुळदेवतेस बकरा किंवा मेंढा बळी देत. अशा प्रकारें हा उत्सव तीन दिवस मोठ्या थाटानें चाले ; त्यांत मुलांकडून सुस्वर पदें म्हणवीत ; व ज्यांचें गायन उत्तम ठरे, त्यांस बक्षिसे देत. आथेन्सचा नगरवासी होण्यांत ग्रीक लोकांस केवढे भूषण वाटे हैं ह्या उत्सवावरून व्यक्त होतें.        

 झांशिवाय ग्रीक लोकांचे धार्मिक महोत्सवही अनेक होते. त्यांत सर्व राष्ट्राचे असे चार मुख्य उत्सव असून, त्या सर्वांत, ऑलिं पिया येथील कसरतीचे खेळ, हा अत्यंत महत्त्वाचा होता. हा उत्सव चार वर्षातून एकवार एलिसच्या मैदानांत ऑलिंपिया येथें जुपिट रच्या प्रीत्यर्थ होत असे. ह्या महोत्सवावरूनच चार वर्षांची काल गणना ग्रीक लोकांत सुरू झाली ; तीस ' ऑलिंपियाड ' असें नांव आहे. एलिसचा राजा व स्पार्टाचा कायदेपंडित लायकरगस ह्या दोघांनीं इ.स.पू. ७७६ ह्या वर्षी, मध्यंतरी बरेच दिवस बंद पडलेले हे ऑलिंपियाचे खेळ पुनरपि सुरू केले, त्या वेळेपासून ही वर्षगणना सुरू झाली. ह्यावरून पहिला ऑलिंपियाड इ.स.पू. ७७६ च्या ग्रीष्मऋतूपासून ७७२ च्या ग्रीष्मऋतूपर्यंत समजला जातो.

 ऑलिंपियाचा व इतर महोत्सव राष्ट्रदृष्ट्या ग्रीक लोकांस फार महत्त्वाचे वाटत. ह्या उत्सवासाठी निरनिराळ्या संस्थानांतील लोक एकत्र जमत, त्यायोगे त्यांमध्यें एक प्रकारचा ऐक्यभाव कायम राहत असे. युद्ध चालू असले तरी, ह्या उत्सवाच्या वेळेस तें तह कुंब राहत असे ; व उत्सवांची जागा पवित्र समजल्यामुळे तेथें युद्धसंपर्क पोंचत नसे. उत्सव संपल्याशिवाय युद्धासाठी उत्स वाच्या प्रांतांत शिरण्याची उभय पक्षांस मनाई असे.

 ग्रीस देशांतील निरनिराळ्या संस्थानांतून ह्या उत्सवांस प्रतिनिधि पाठविण्यांत येत असत. ते प्रतिनिधि अशा प्रसंगी मोठी चढाओढ करून विशेष थाट करीत, व मौल्यवान नजराणे आणीत. ऑलिंपिया येथील मुख्य मंदीर एटिस नांवाच्या पवित्र राईत होतें. उत्सवास आलेला प्रत्येक इसम तेथील देवापुढें आपापली भेट आणून ठेवी, व पुजाभ्यांस दक्षणा देई. एक पुजारी देवद्वारीं उभा राहून दर्श नास आलेल्या प्रत्येक यात्रेकरूवर लॉरेलच्या पानांनीं अभिषिंचन करी.  ऑलिंपियाच्या खेळांत प्रथम फक्त पायीं धांवण्याच्या शर्यती होत ; पुढें पुढें कुस्त्या, उड्या मारणें, कडीचे खेळ, वज्रमुष्टी ( फेंकून भारण्याचा भाला ) फेंकणें, रथांच्या व गाड्यांच्या शर्यती, इत्यादि खेळ सुरू झाले. इराणी लोकांनीं ग्रीस देशावर प्रथम स्वारी केली, त्यापूर्वी हा उत्सव एकच दिवस चाले ; त्या स्वारी नंतर तो पांच दिवसांचा झाला. ऑलिंपियाचे खेळांत मोठमोठ्या दर्जाचे लोक सामील होत. जय मिळविण्याविषयीं मोठी स्पर्धा चाले, व विजय संपादणारास नाना तऱ्हेचे बहुमान मिळत. देवाच्या पवित्र राईतील ऑलिव्ह झाडाची फांदी तोडून तिचा तुरा शिरोभूषण म्हणून त्यास देण्यांत येई ; आणि ज्याप्रमाणें राजा च्या नांवाचा जयघोष करीत चोपदार ललकारतात, त्याप्रमाणें विजय संपादणान्याचा जयघोष करीत. एखाद्या मोठ्या बादशहा प्रमाणे त्याची स्वारी काढून त्यास आपल्या नगरास पोंचवीत.

 ऑलिंपियाप्रमाणेच पायथियन खेळही प्रसिद्ध होते. ते डेल्फाय येथें दर तीन वर्षांनीं होत, व त्यांचा रचना बहुतेक ऑलिंपिया प्रमाणेच असे. मात्र पुढे पुढे ह्या उत्सवांत गायनकलेचीही परीक्षा घेऊन बक्षिसे देण्याचा प्रघात पडला.

 ह्यांशिवाय नीमियन नांवाचा राष्ट्रीय उत्सव दर ऑलिंपियाडच्या दुसऱ्या व चवथ्या वर्षी, आणि इस्थमियन नांवाचा उत्सव ऑलिं पियाच्या पहिल्या व तिसऱ्या वर्षी होत असे. नीमियन उत्सव पिलॉप निशन संस्थान आगॅस यांतील नीमिया शहरीं व इस्थमि यन उत्सव कॉरिन्थ येथें होई. ह्या ठिकाणच्या खेळांत अनेक मेळे जमून त्यांची गाणी होत असल्यामुळे, मोठी गंमत उडे ; आणि मेजवान्या, बळी, स्वान्या व मेळे इत्यादि सर्व सामाजिक प्रकारानीं त्यांस मोठें महत्त्व आलेलें होतें. सर्व प्रकारच्या उत्सवांत मोठ मोठ्या जत्रा भरत, त्यांत नाना प्रकारचे जिन्नस विक्रीसाठी मांडलेले असून, शिवाय सर्व लोकांच्या करमणुकीचेही अनेक प्रकार चालत.उदाहरणार्थ, एक बकण्याचे कातडे पसरून त्यावर तेल ओतून तें सुळसुळीत करीत, व त्याजवर न पडतां जो नाच करून दाखवील त्यास ते कातडें बक्षीस मिळत असे.

 ह्यांशिवाय लहान लहान उत्सव अनेक होते. डायोनिशिया नांवाचा एक उत्सव सर्व खेडेगांवांतून वर्षातून चार वेळां होत असे. तो बॅकस म्हणजे काम- देवाच्या सन्मानार्थ होता. ह्या उत्सवांत मद्यपान व दंगा अतोनात चालू झाला, अशा प्रकारच्या तमाशांत अनेक गांवढळ लोक नानाप्रकारचीं सोंगें घेऊन नाचत कांहीं लोक वनदेवांचीं सोंगें घेत, व कांहीं स्त्रियांची सोंगें घेऊन वनदेवता होत. ह्या डायोनिशिया उत्सवाची उत्पत्ति मद्य तयार करण्याच्या कामा मुळे झाली ; व तो धान्य कापण्याच्या दिवसांत होत असून, त्यांत गुलाम व सर्व लोक सामील होत असत, हा आपल्याकडील शिमग्यासारखाच असे.

 ग्रीक लोकांत अनेक गुप्त मंत्र व पूजाविधि चालू असत. " असले प्रकार रात्रीच्या वेळीं एकांत जागेत करण्यांत येत. त्यांत थोड्याच लोकांचा प्रवेश असे ; व त्यांस सर्व प्रकार गुप्त ठेवण्याची शपथ घ्यावी लागे. अशा प्रकारचे विशेष प्रसिद्धीस आलेले प्रकार म्हटले म्हणजे, ॲटिकांतील इल्युसिस शहरचे होत. डोरियन लोकांचा प्रवेश ग्रीस देशांत झाला, तेव्हांपासून हे गुप्त पूजेचे प्रकार सुरू झाले असें म्हणतात. त्या लोकांत प्राचीन काळी जे धर्मप्रचार होते, ते पुढें सतत चालू ठेवण्याच्या उद्देशानें है गुप्त प्रकार सुरू झाले. पुढे पुढे त्यांच्या देवता ठरल्या, व त्या देवतांची पूजा ह्या गुप्त विधीनें होऊं लागली. परंतु ज्यांचा त्या अंतर्मंडळांत प्रवेश असे, तेवढ्यांसच त्यांतील इंगित कळे. त्यांतील एकंदर प्रकार इतका गुप्त ठेवण्यांत येत असे कीं, त्यांचा खरा उद्देश न खग विधि ह्यांविषयीं कांहींच माहिती उपलब्ध नाहीं.  


प्रकरण साहावें  - सोलनपासून  इराणी युद्धापर्यंत

(इ.स.पू.  साहावें शतक)


   सोलननें राज्यकारभार सोडल्यावर तीन गृहस्थ त्याकरितां भांडूं लागले. त्या भांडणांत पिझिस्ट्रेटस ह्यास जय मिळून तो कारभार पाहू लागला. हा पूर्वी सोलनचा दोस्त असून अत्यंत लोक प्रिय होता. त्यानें आथेन्स शहराची पुष्कळ सुधारणा केली ; व नाना तऱ्हेच्या भव्य व सुंदर इमारती बांधून शहरास शोभा आणिली. ह्या इमारतींत अपॉलोचें देऊळ व लायसियम नांवाची कसरतशाळा ह्या दोन विशेष प्रसिद्ध होत्या. ग्रीक लोकांत कसर तीचें माहात्म्य विशेष असून, तिचें शिक्षण सर्वांस देण्यांत येत असे. लायसियम शाळेचे अनेक मोठमोठे भाग होते. सभोंवार झाडी व बागा होत्या. त्या ठिकाणीं आथेन्सचीं मुलें कसरतीचे खेळ व व्यायाम करण्याकरितां येत. पुढें कांहीं शतकांनीं लायसियमच्या इमारतींत विद्वान तत्त्ववेत्ते व कवि वगैरे राहूं लागल्यामुळे, तें विद्यापीठ बनलें.

 आथेन्स येथें पिझिस्ट्रेटसनें नवीन सुधारणा केल्या, त्यांकरितां त्यास लोकांवर कर बसवावा लागला. हा कर जमिनींतील उत्पन्नाच्या एकदशांश असून, त्यामुळे लोकांत पुष्कळ असंतोष उत्पन्न झाला. उदाहरणार्थ, एकदां पिझिस्ट्रेटस खेडेगांवांतून फिरत असतां, एक शेतकरी कांहीं नापीक जमिनीत काम करतांना त्यास दिसला. त्याजला आपल्या नोकराकरवीं पिशिस्ट्रेटसनें विचारिलें, " ह्या जमिनीचें उत्पन्न काय आहे ? ' त्यावर शेतकरी रागावून बोलला, ८उत्पन्न होय ? श्रम व त्रास ; झालें ; मग मला काय पर्वा ? पिलिस्ट्रेटसनें त्यास कर माफ केला. पिलिस्ट्रेटसचा कर मिळाला म्हणजे त्यांचें हें चोख उत्तर ऐकून पिझिस्ट्रेटसनें त्यास कर माफ केला.    

 ग्रीक इतिहासांत पिझिस्टेटस ह्यास आथेन्सचा ' टायरंट ' म्हणतात.. टायरंट शब्दाचा अर्थ हल्लीं ' क्रूर व जुलमी राज्यकर्ता ' असा आहे. तो त्यावेळीं नव्हता. ग्रीक भाषेत टायरंट ' म्हणजे स्वतःच्या हुशारीनें सर्व राज्यसत्ता संपादन करून स्वत : च्याच इच्छेनें राज्य कारभार हांकणारा गृहस्थ ' असा होता. म्हणजे ग्रीक लोकांचा टायरंट सज्जन व परोपकारी असू शके ; व पिझिस्ट्रेटस तशा प्रकारचा होता है इतिहासावरून व्यक्त होत आहे. पिझिस्ट्रेटसनें असा एक कायदा केला कीं, युद्धांत पंगू झालेल्या सर्व लोकांस सरकारानें पोसावें. पिझिस्ट्रेटसनें विद्येच्या प्रसारार्थ पुष्कळ यत्न केले. ग्रीस देशांतील पहिले वाचनालय त्यानेंच स्थापिलें. होमर आशिया खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर निपजला, त्याचीं कवनें त्या ठिकाणीं प्रचलित होतीं ; तीं ग्रीक लोक तेथें वसाहत करण्यास आले, त्यांनी आपल्या बरोबर स्वदेशीं परत आणिली. ती सर्व एकत्र करून लिहून ठेव ण्याचें काम पिझिस्ट्रेटस ह्यानें केलें. ग्रीक लोकांनों आशियाच्या किना - यावर जाऊन निरनिराळ्या वेळीं वसाहती केल्या, हा प्रकार मागे आलाच आहे. आशियांतील ह्या वसाहतींस आयोनिया अशी संज्ञा होती. आयोनियांत तेरा ग्रीक नगरसंस्थांनांचा समावेश होता. त्याचप्रमाणे इटलीच्या दक्षिण किना - यावर व सिसिली बेटाच्या किनाऱ्यावर ग्रीक लोकांनीं वसाहती केल्या होत्या. तथापि हे सर्व लोक आरंभी ग्रीस देशांतून बाहेर गेले. ग्रीक लोकांनी इजिप्त देशांतही आपल्या वसाहती केल्या होत्या.

 चित्रकला व मातीचे पुतळे करण्याची कला प्रथम कॉरिन्थच्या लोकांनी विशेष प्रसिद्धीस आणिली असें म्हणणात. पण कॉरिन्थ बरोबरच आगॅस, ईजीना, व्होड्स आणि क्रीट ह्या ग्रीक संस्था नांत वरील कलांची अभिवृद्धि झालेली होती ह्यांत संशय नाहीं.

 पिझिस्ट्रेटस कारभार करीत असतां, डेल्फायचें मंदीर जहून गेलें. तें पुनरपि बांधण्यासाठीं डेल्फायच्या लोकांनी वर्गण्या गोळा करण्यास सर्व ग्रीक संस्थानांत आपले वकील पाठविले ; व स्वतः एकचतुर्थीश खर्च सोसण्याचें कबूल केलें. सर्व संस्थानांतून पुष्कळ वर्गणी जमा झाली. इजिप्टचा राजा अमासिस ह्यानें सुद्धां बर्गणी पाठविली. अशा रीतीनें डेल्फायचें मंदीर पहिलें साध्या दगडाचें होतें, तें आतां आरसपानी दगडाचें झालें. ह्या मंदिरास तीनशें टॅलॅट म्ह ० पंधरा लाख रुपये खर्च झाला पिझिस्ट्रेटस इ.स.पू. ५२७ वे वर्षी मरण पावला.    

 तदनंतर पिझिस्टेटसचे दोन मुलगे हिपियास आणि हिपार्कस ( Hippias and Hipparchus ) हे कारभार पाहूं लागले. ह्या दोघां भावांनी बापाचाच कित्ता वळवून लोकोपयोगी कामें केलीं व विद्याकलांस उत्तेजन दिलें. अनाक्रिऑन ( Anacreon ) व साथ मोनाइड्स ( Simonides ) ह्या कवींस त्यांनीं आथेन्स येथें मुद्दाम आणून ठेविलें. दोन वर्षे कारभार केल्यानंतर ह्या दोघां बंधूंस ठार मारण्याचा एक गुप्त बेत आरिस्टोजिटन ( Aristogiton ) आणि हार्मोडियस ह्या दोघांनी केला. तो सिद्धीस गेला तर राज्यकारभार स्वतःचे हातीं घेण्याचा त्यांचा विचार होता. आथेन्स येथें मिनव्ही देवीच्या सन्मानार्थ पॅनाथिनी ( Panathene ) नांवाचा उत्सव होत असे, त्याप्रसंगी सर्व लोक भाले व ढाला घेऊन मेळ्यांत येत. त्या उत्सवांत हा वरील बेत उरकून घ्यावयाचा होता. त्यांत हिपार्कस ठार झाला, पण हिपियस वांचला ; आणि त्यानें मुख्य मुख्य कटवाल्यांस पकडून ठार मारिलें. ह्यापुढे त्यानें चार वर्षे कारभार केला, तो लोकांस नापसंत होऊन त्यांनी त्यास अधिकारावरून काढिले आणि सर्व कुटुंबासह हद्दपार केलें.

 तदनंतर क्लाइस्थेनिस ( Cleisthenes ) हा राज्यकारभार पाहू लागला. त्यानें पुष्कळ सुधारणा केल्या, त्यांत विशेषतः बड्या लोकांचें वजन मोडून मध्यम व कनिष्ठ वर्गीच्या लोकांस वर आणण्याचा त्याचा रोंख होता. प्राचीन काळचे लोकांचे चार वर्ग होते, ते त्यानें मोडून दहा नवीन वर्ग बांधिले. ह्या दहांपैकीं प्रत्येकाचे आणखी दहा दहा पोटविभाग करून त्यांस डेमीस अशी संज्ञा दिली. डेमींत नगर किंवा खेडें यांचा समावेश होत असे. प्रत्येक डेमीवर डेमार्क ( Demarch ) नांवाचा एक अंमलदार त्यानें नेमिला. सर्व डेमीची सभा भरवून सार्वजनिक प्रश्नांचा निकाल करणें, आपापल्या हद्दीत बंदोबस्त ठेवणें व सर्वांनी आपल्या जमिनीचा सारा वेळच्या वेळी भरला कीं नाहीं हैं समजण्याकरितां खातेदारांची नोंद ठेवणें, ह्रीं कामें डेमार्कचीं होतीं.

 सर्व प्रकारच्या करांचा इजारा किंवा मक्ता एका इसमास देण्याची आथेन्स येथें वहिवाट होती. एक इसम किंवा अनेक इसमांचें एक मंडळ मक्तेदार ठरवून, त्यांजपासून ठरीव रकम घेऊन कराचा वसूल करण्याचा संपूर्ण मक्ता त्यांस देण्यांत येत असे. रस्त्यांची दस्तुरी, मालावरील जकात वगैरे झाडून साया उत्पन्नाच्या बाबी मक्त्याने देत असत. जमीनमहसुलाचा मात्र मक्ता नव्हता. वरच्या शिवाय सर्व प्रकारच्या आयात व निर्गत मालावर शेंकडा दोन टक्के जकात होती ; व गुलामांवर एक कर होता. परस्थांस आथेन्स येथे येऊन राहवयाचें असल्यास त्याबद्दल त्यांस कर द्यावा लागे ; तसेंच सार्वजनिक बाजारांत मालाची विक्री करण्याबद्दलही कर होता.

 नगरवासी म्हणून ग्रीक लोकांचे हक्क होते, त्यांत क्लाइस्थेनिसनें पुष्कळ बदल केला. सर्व स्वतंत्र लोक, बरेचसे परदेशी, व वरचढ दर्जाचे गुलाम, ह्या सर्वस त्यानें नगरवाशांचे हक्क दिले. राज्य कारभार हांकणारी सेनेट सभा होती, तींत, प्रत्येक जातीचे पन्नास ह्याप्रमाणे नवीन केलेल्या दहा जातींचे मिळून पांचशे सभासद असावे, अशी व्यवस्था केली. या पांचरों असामींपैकी प्रत्येक पन्नासांनी छत्तीस दिवस काम करावें ; व त्यानंतर दुसन्या पन्ना सांनीं, ह्या प्रमाणें वर्षभर कारभार चालावयाचा होता. ग्रीक लोकांचें वर्ष चांद्रमानाचें म्हणजे ३५४ दिवसांचं होतें, त्यास अनुसरून वर्षाचे दहा भाग करून हे दिवस ठरविलेले होते.

 ह्या पन्नास सभासदांस प्रायटेन्स अशी संज्ञा होती. खजिन्याची व्यवस्था व परराष्ट्रीय वकिलांशी वाटाघाट करून तह वगैरे ठरविणे, ह्रीं ह्या प्रायटेन्सचीं मुख्य कामें होतीं. पण युद्ध सुरू करणें व चाललेलें युद्ध बंद करणे, असली महत्त्वाची कामे प्रायटेन्स हे राष्ट्रीयसभेकडे पाठवीत असत. राष्ट्रीय सभेतील गरीब सभासदांस पगार देण्याचा सोलननेंच कायदा केला होता.

 जुलमी व दुष्ट लोकांस हद्दपार करण्याचा एक चमत्कारिक प्रकार ह्या वेळीं चालू झाला. कोणीही इसम स्वराष्ट्रद्रोही आहे असा वहीम आल्यावर त्याचा तपास न करितां किंवा त्यास गुन्ह्याची वर्दी न देतां, ह्या कायद्यानें त्यास इद्दपार करणे सुलभ पडत असे. त्यासाठी राष्ट्रीय सभेचें आवार कठंडा घालून बंद करीत. ह्या कठड्यास दहा जातींच्या लोकांस आंत येण्याकरितां दहा दारें ठेवीत. त्यांतून सर्व जातींचे लोक आंत गेले, म्हणजे प्रत्येकानें ज्यास हद्दपार करावयाचे असेल, त्याचें नांव एका शिंपीवर लिहून, ती शिंप एका मोठ्या भांड्यांत टाकावयाची, असा निर्बंध होता. संध्याकाळी सर्व लोकांच्या शिंपा जमा झाल्या, म्हणजे त्या मोजीत, व त्यांची संख्या सहा हजार भरली तर त्या इसमास दहा वर्षे पावेतों हद्दपार करण्यांत येत असे. हा प्रकार क्लाइस्थेनिसनेंच प्रथम सुरू केला असे म्हणतात. ह्या शिक्षेची बजावणी प्रथम क्लाइस्थेनिसवरच झाली.

 क्लाइस्थेनिस कारभार पाहत असतां आथेन्स आणि स्पार्टा ह्यांचें युद्ध जुंपलें, क्लिओमेनिस नांवाचा स्पार्टाचा राजा होता, त्याने मोठी फौज घेऊन आथेन्सवर स्वारी केली आणि तेथील किल्ला हस्तगत केला. तेव्हां आथेन्सच्या लोकांनीं निकरानें लहून तीन दिवसांत किल्ला परत घेतला. म्हणून क्लिओमिनिस यास परत जावें लागलें. पुढे क्लिओमिनिस ह्यानें कॉरिन्थियन व बिओशियन लोकांची मदत घेऊन दुसऱ्या बाजूनें आथेन्सवर स्वारी केली. त्याजबरोबर लढ ण्यासाठीं आथेन्सचे लोक तयार होऊन आले. इतक्यांत स्पार्टन लोकांनी चालविलेले हैं युद्ध गैर आहे, असें कॉरिन्थियन लोकांस वाटून, त्यांनी स्पार्टाचा पक्ष सोडिला. तेव्हां एकट्या बिओशियन लोकांचा आथिनियन फौजेनें तेव्हांच पराभव केला. बिओशियन लोकांस चाल्सिडियन लोकांची मदत होती. त्यांचाही पराभव होऊन, त्यांस आपला बराच मुलूख आथैन्सला द्यावा लागला. त्या मुलखांत आपल्या लोकांची वसाहत करण्याकरितां अँटिका प्रांतांतून चार हजार कुटुंबें चाल्सिडियांत पाठविण्यांत आलीं. ग्रीस देशांत ग्रीक संस्थानानें स्थापिलेली पहिली वसाहत हीच होय.

 आथेन्सचा कारभार क्लाइस्थेनिस पाहत होता, त्यास काढून हिपियस यास पुनः कारभार देण्याची खटपट स्पाटीचा राजा क्लिओमिनीस ह्यानें केली. पण ह्या कामी त्यास इतर संस्थानांचें साह्य हवें होतें तें मिळालें नाहीं. तेव्हां हिपियस ह्यानें इराणचा राजा डरायस हिस्टास्पिस ह्याजकडे संधान बांधून त्याची मदत मागितली ; व आपणास आथेन्सचा कारभार मिळाल्यास, आपण हें सर्व संस्थान इराणचे स्वाधीन करूं असें हिपियसनें कबूल केलें. त्यावरून डरायसनें आथेन्सच्या सरकारास असा हुकूम पाठविला कीं, ' आथेन्सचा कारभार एकदम हिपियसचे हवालीं करावा. आथीनियन लोकांनी हा हुकूम गुंडाळून ठेवून इराणशीं लढण्याची तयारी केली.


प्रकरण सातवें - इराणी युद्ध    

 आरंभापासून सलामिसच्या लढाईपर्यंत(इ.स.पू ४९२ - ४८०)

   इराणांत जे पराक्रमी राजे झाले त्यांत डरायसची गणना आहे. त्याच्या राज्याचा विस्तार पश्चिमेस ईज्यनसमुद्र व पूर्वेस सिंधुनद , तसेंच उत्तरेस सिथियन मैदान व दक्षिणेस इजिप्तची नीलनदी , एवढा होता. त्याच्या राज्याचे एकंदर वीस सुभे किंवा प्रांत होते. प्रत्येक प्रांतांवर सत्रप नांवाचा एक अधिकारी असे. ह्या सत्रपाची राहणी व अम्मल एखाद्या स्वतंत्र राजासारखा होता. आशियाच्या पश्चिम किनाऱ्यावर ग्रीक लोकांच्या वसाहती होत्या. त्या वसाहतींच्या प्रदेशास आयोनिया असे म्हणत. तेथचें मुख्य शहर मायलिटस म्हणून होतें. ह्या वसाहतींवर वस्तुत : डरायसचाच ताबा होता. वसाहतीतील ग्रीक लोकांस खुष ठेवण्यासाठी तेथचा सत्रपक्षी डरायसनें ग्रीक जातीचाच नेमिला होता ; परंतु एवढ्यानें ग्रीक लोक संतुष्ट होणारे नव्हते. त्यांस इराणचा अंमल नको होता. अरिस्टागोरास नामक मायलिटसचा ग्रीक सत्रप होता , त्यासच मुख्य करून , आशियांतील सर्व ग्रीक लोकांनीं डरायसचा अंमल झुगारून देण्याच्या हेतूनें बंड सुरू केलें.

 अरिस्टागोरास स्पार्टाचा राजा क्लिओमिनिस याजकडे मदत मागण्याकरितां गेला. डरायसच्या राज्यविस्ताराविषयीं क्लिओमिनिसची खात्री करण्याकरितां आरिस्टागोरासनें आपल्याबराबर एक पृथ्वीचा नकाशा तयार करून नेला होता. हा नकाशा कांसधातूच्या पटावर ओबडधोबडच काढलेला असून , त्यावर नद्यांचे प्रवाह व समुद्राचे आकार त्या वेळच्या माहितीनुरूप दाखविलेले होते. डरायसच्या राज्याचा विस्तार व त्यांची शक्ति ह्यांची क्लिओमिनिसला बरोबर कल्पना यावी एवढाच ह्या नकाशाचा उद्देश होता. युरोपांत झालेला पहिला नकाशा हाच होय.

 अरिस्टागोरासला क्लिओमिनिसची मदत मिळाली नाहीं. त्यानें क्लिओमिनिसला ह्या मदतीबद्दल अडीचलाख रुपये देऊं केले , तथापि उपयोग झाला नाहीं. उलट त्यास राजानें स्पार्टातून घाल वून दिलें असें सांगतात कीं , अरिस्टागोरासनें पैशाची लालूच दाखवितांच क्लिओमिनिसचा निश्चय डळमळू लागला होता ; इत क्यांत गोर्गो ( Gorgo ) नांवाची क्लिओमिनिसची आठ वर्षीची मुलगी होती , ती बापास म्हणाली , " बाबा , चला येथून निघून जा. नाहीं तर आपणास पाप लागेल". हे शब्द ऐकतांच क्लिओमिनिस उठून चालता झाला.  

 अरिस्टागोरासनें आपला वकील आथेन्स येथेही पाठविला होता. हिपियस यास आयेन्सचा कारभार द्यावा असा इराणी राजाचा हुकूम आयेन्सला येऊन पोचला , त्याच वेळेस हा वकीलही येऊन पोंचला. तेव्हां आयोनियाच्या ग्रीक लोकांस मदत करण्याचा आथेन्सच्या लोकांनीं एकदम निश्चय केला ; व अत्यंत त्वरा करून वीस लढाऊ जहाजें तयार केलीं. यूबिया बेटांत इरिट्रिया नांवाचें संस्थान होतें , तेथून पांच जहाजें आलीं. ह्या सर्व आरमारानें मिळून इराणी मुलखावर हल्ला करून सार्डिस शहर जळून टाकिलें , पुढे एक लढाई झाली , तींत इराणी लोकांस जय मिळाला , व आथीनियन लोक युद्ध सोडून परत स्वदेशीं आले.

 आयोनियन लोकांबरोबर डरायस सहा वर्षे लढत होता. अखेरीस त्यानें ग्रीक लोकांचें मुख्य शहर मायलिटस हस्तगत केलें ; व जे ग्रीक लोक त्याच्या हातांत जिवंत सांपडले त्यांस पकडून त्यानें तैग्रीसनदीच्या मुखाशीं नवीन वसाहत करण्यास पाठविलें. त्यानंतर आशियांतील सर्व ग्रीक शहरें एकामागून एक इराणच्या हस्तगत झाली. तेणेंकरून आशियांतील ग्रीक लोकांस जिंकण्याचा डरायसचा संकल्प पुरा झाला.

 पण एवढ्यानेंच डरायस स्वस्थ बसला नाहीं. सार्डिस शहर जाळ ल्याबद्दल आथिनियन व इरिट्रियन लोकांचा सूड घेण्याकरितां आथेन्सवर स्वारी करण्याची त्यानें तयारी केली. "आमचा ताबा तुम्हांस कबूल आहे याची खूण म्हणून आलेल्या जासुदा बरोबर माती आणि पाणी पाठवून द्या" असे निरोप डरायस यानें सर्व ग्रकि संस्थानांस पाठविले. थीन्स आणि ईजीना ह्यांनीं ही बेअदबी सहन करून , इराणी राजाचें भागणें कबूल केलें ; पण आथेन्स आणि स्पार्टी ह्यांनीं तें जुमानलें नाहीं. क्लिओमिनिस आपली फौज घेऊन एकदम ईजीनावर आला ; तें संस्थान जिंकून त्यानें आपल्या हस्तगत केलें , आणि तेथील लोकांपासून असें वचन घेतलें कीं , आपण शत्रूंस जाऊन मिळणार नाहीं. ह्या ईजीनाशी लढतांना क्लिओमिनिसनें अत्यंत क्रूरपणाचें आचरण केलें. तेथची राजधानी आरगॉस येथील देवाच्या राईत कांहीं लोक भिऊन लपून बसले होते , सबब क्लिओमिनिसनें ती राई जाळून टाकिली. पुढे लवकरच वेड लागून क्लिओमिनिसने आत्महत्या केली. देवाची राई जाळल्याबद्दल देव.स राग येऊन त्यानें अशा प्रकारें लिओमिनिस ह्यास शिक्षा केली , अर्से ग्रीक लोक म्हणूं लागले.

 इकडे इराणी लोकांनी मोठें आरमार घेऊन ग्रीसवर स्वारी केली. रस्त्यांत त्यांनी अनेक बेटे हस्तगत केलीं ; व यूबिया येथें येऊन इरिट्रियाला वेढा घातला. नंतर तें शहर हस्तगत करून इराणी लोकांनी जाळून टाकिलें. पुढे इराणी लोक जहाजांतून अॅटिका प्रांतांत येऊन मारेथानच्या मैदानांत तळ देऊन राहिले. त्यांजबरोबर सामना देण्यास प्लॅटियांतले ग्रीक लोक आले. स्पार्टाची मदत मागण्याकरितां त्यांनीं धांवते जासूद पाठविले. हे जासूद दांडरों मैल अंतर ४८ तासांत चालून गेले. निरनिराळ्या ग्रीक संस्था नांत एकमेकांशीं दळणवळण ठेवण्याचें साधन धांवणारे जासूद एवढेच असल्यामुळे , जलद धांवण्याची शक्ति लोकांच्या अंगी त्या वेळीं उत्कृष्ट होती. मारेथानपासून सार्टापर्यंतचा प्रवास जासुदांनीं इतक्या लवकर केला , ह्यावरून ग्रीक लोकांची शक्ति दिसून येते.

 ग्रीक फौजेवर दद्दा सेनापति होते. त्यांपैकीं दररोज एक असामी फौजेचा मुख्य होत असे. इराणी फौज अतिशय मोठी होती , म्हणून ग्रीक सेनापतीस तिजवर हल्ला करण्याची छाती होईना. तेव्हां मिल्टियाडिस ( Miltiades ) नांवाचा धाडशी व युद्ध कलेत प्रवीण असा एक गृहस्थ होता , तो ग्रीक फौजेचा मुख्य झाला. त्यानें इराणी लोकांशीं लहून त्यांचा संपूर्ण पराभव केला. ही मारेथानची लढाई इ.स.पू. ४९० ह्या वर्षी झाली.

 ह्या लढाईचीं वर्णनें अतिशयोक्तिनें भरलेलीं आहेत ; तरी पण ग्रीक लोकांहून इराणी लोकांची संख्या अतिशय मोठी होती. ग्रीक फौजेंत गुलामांची भरती विशेष असून , त्यांस युद्धशिक्षण मिळालेले नव्हतें. तथापि , जय मिळाल्यास तुम्हांस स्वातंत्र्य मिळेल , असें वचन त्यांस दिलेले असल्यामुळे त्यांनीं लढण्याची शिकस्त केली. ह्या विजयामुळें मिल्टियाडिसचा लौकिक अतिशय वाढला. लोकांनीं आथेन्स येथें महोत्सव करून नाना प्रकारें आनंद प्रगट केला. त्यांनी लढाईत पडलेल्या आथीनियन लोकांचीं प्रेतें मोठ्या थाटानें पुरून , त्यांवर एक भव्य इमारत बांधिली. ह्या इमारतीला दहा प्रचंड खांब असून , त्यांवर दहा जातींच्या लोकांची नांवें खोदलेलीं होतीं. गुलाम आणि प्लॅटियाचे लोक ह्यांच्या प्रेतांवरही दुसरी एक अशीच इमारत बांधिली.     हल्ली मॅरेथानचें मैदान उघडे व ओसाड आहे. त्या ठिकाणीं मनुष्यवस्ती नाहीं. समुद्रापासून सुमारें अर्ध्या मैलावर लाल मातीचा एक ढीग आहे. त्याची उंची ३० फूट व घेर ६०० फूट असून , जवळच एका चौकोनी आरसपानी मनोन्याचे अवशिष्ट भाग एकत्र होऊन पडले आहेत. हा मनोरा मिल्टियाडिसच्या सन्मानार्थ आथीनियन लोकांनी बांधिला होता.

 ह्या पराजयानें डरायसला फार वाईट वाटलें ; व पुन : पांच वर्षे सतत खपून त्यानें ग्रीसदेशावर स्वारी करण्याची जंगी तयारी केली. पण ती पूर्ण होण्यापूर्वीच तो मरण पावला ; तेव्हां त्याचा मुलगा क्झक्शस ह्यानें ग्रीस देश जिंकण्याचा पक्का निश्चय करून , तत्प्रीत्यर्थ ज्यास्तच जोरानें सर्व सिद्धता केली.

 ह्या वेळीं थेमिस्टॉक्लिस हा आथेन्सचा कारभार पाहत होता. तो घरंदाज व सधन असून , त्यानें आरमाराच्या योगानें आथेन्सचं सामर्थ्य पुष्कळ वाढविलें. अॅटिकाप्रांतांत लॉरियम येथें चांदीच्या खाणी होत्या , त्यांचें उत्पन्न त्यानें दरसाल वीस जहाजें नवीन बांधण्याकडे लावून दिलें , ह्या कामाची सर्व व्यवस्था नीट ठेवण्या करितां त्यानें एक स्वतंत्र कमिटी नेमिली थेमिस्टॉक्लिसनें बांध लेलीं जहाजें तिमजली असून , प्रत्येकावर दोनशें खलाशांची सोय होती. त्यांचा वेग इल्लींच्या आगबोटींच्या जवळ जवळ होता. त्यांच्या पुढील चोंचीच्या वरच्या अंगास रंगीत चित्रे काढिलेली असून , खाली आलेल्या टोकांस लोखंडी भाला ठोकलेला होता , तेणेंकरून तें टोंक शत्रूच्या जहाजांत एकदम शिरत असे. शत्रूचे बाग आंतील लोकांस लागूं नयेत , म्हणून कातड्याचे किंवा टोपलीच्या विणीसारखे कठडे त्या जहाजांच्या सभोंवार लावीत , त्यांजवर वल्हीं मारणारे बहुतेक गुलामच असत ; पण खलाशी मात्र खालच्या वर्गातील स्वतंत्र लोक असत.    

 मारेथानच्या लढाईनंतर दहा वर्षांनीं क्शकशस युरोपांत आला. त्याच्याबरोबर एवढी मोठी फौज होती की , पूर्वी कधीं कोणीं अशी फौज युरोपांत आलेली पाहिली नव्हती , तींत निरनिराळ्या राष्ट्रांचे लोक असून , त्या सर्वांनी आपापल्या राष्ट्रांचे पोषाख व हत्यारें धारण केली होतीं , एवढ्या फौजेस धान्यसामुग्री वगैरे पुरविण्याकरितां पुरुष , बायका , गाडे वगैरेंचे तांडेच्या तांडे त्या फौजेबरोबर होते. बादशहा आपल्या सुंदर रथांत बसून चालत होता ; त्याच्या बंदोबस्तास निवडक पहारा असून , जेथें जेथें मुक्काम होई , तेथें तेथें स्वत : च्या राजवाड्यासारखी त्याच्या जेवणाखाणाची सर्व तजवीज लागत असे.

 आथोस पर्वतापासून मुख्य महाद्वीपांस जोडणारी एक अरुंद संयोगिभूमि आहे , तीवरून फौज जाण्यास अडचण पडूं नये , म्हणून त्यानें ती संयोगिभूमि खणून तेथें एक कालवा केला. तसेंच मार्मोराचा समुद्र व ईज्यन समुद्र यांस जोडणारी हेलेस्पांट नांवाची अरुंद सामुद्रधुनी आशिया व यूरोप यांजमध्यें आहे , त्या सामुद्रधुनीवर त्यानें होड्यांचा एक पूल बांधिला. हा पूल बांधणारे लोक इजिप्शन व फिनिशियन होते. पूल तयार झाल्यावर वादळ होऊन तो तुटून गेला. तेव्हां त्यानें होड्यांच्या दुहेरी गंगा एकास एक लावून , पुन : दुसरा मजबूद पूल तयार केला. त्या सर्व होड्या दोरखंडांनीं जखडून टाकिल्या ; व प्रत्येक होडीचा नांगर पाण्यांत टाकून ती हालेनाशी केली. नंतर त्या होड्यांवर आडव्या फळ्या टाकून त्यांवर माती घातली व दोनही बाजूंस कठडा उभा केला ; तेव्हां हा पूल उत्कृष्ट रस्त्यासारख च झाला. हे काम करण्यास क्शक्शिसनें वेठीचे लोक धरून आणिले , त्यांजकडून काम घेण्याकरितां स्वतःच्या खात्रीचे मुकादम नेमलेले होते. ह्या पुलावरून सात अहोरात्रपर्यंत क्शक्शिसची फौज पलीकडे जात होती. खुष्कीची फौज थ्रेसप्रांतांतून गेली , तेव्हां त्या प्रांतांतील प्रत्येक शहराला एक दिवसाची सामुग्री ह्या फौजेस द्यावी लागली. ह्या जबरदस्तीनें कांहीं शहरें तर कायमचीं नाश पावलीं ; कारण एवढ्या मोठ्या फौजेचें एक दिवसाचें अन्न कांहीं थोडें नव्हतें.

 ह्या भयंकर अरिष्टाशी सामना करण्याकरितां आथेन्स आणि स्पार्टा ही संस्थाने एक झाली. दुसरीं कांहीं संस्थानें त्यांस प्रथम मिळालीं होतीं , पण त्यांनीं भावी परिणामावर नजर देऊन आपला पाय आरंभींच जुटींतून काढून घेतला. अशा प्रकारचा स्वदेशद्रोह करण्यांत अग्रगण्य संस्थान थेसली होय. थेसलीचे लोक क्शर्विस ह्यास नुसते शरण जाऊन स्वस्थ बसले नाहीत , तर उलट त्याच्या फौजेंत सामील होऊन आथेन्सबरोबर लढण्यास आले. थेसली , आणि ग्रीस देशाचे इतर प्रांत , ह्यांमध्यें मोठमोठे उंच पर्वत आहेत. त्यांवरून ग्रीस देशांत फौज उतर ण्याची एकच अरुंद वाट आहे. तिला थर्मापिली असें म्हणतात. हिच्या एका बाजूस ईटाचा डोंगर व दुसऱ्या बाजूस समुद्र आहे. इराणी फौजेस प्रतिबंध करावयाचा म्हणजे ह्या वाटेच्या पुढें तीस येऊं द्यावयाचें नाहीं. इराणी फौजेस अडविण्याचें हें काम स्पार्टाचा राजा लिओनिडास ह्यानें पत्करिलें तो आपले लोक घेऊन ही अरुंद वाट अडवून बसला. इराणी लोकांनी ह्या वाटेनें आंत शिरण्याचे अनेक प्रयत्न केले ; पण ते सफळ झाले नाहींत. शेवटीं एफिऍल्टिस नांवाचा ट्राकिनिया प्रांतांतला एक ग्रीक गृहस्थ फितूर होऊन शत्रूस मिळाला. त्यानें पर्वतांवरून आंत येण्याची एक लहानशी वाट क्झक्शस ह्यास दाखविली. त्या वाटेनें थोडीशी इराणी फौज लिओनिडासच्या पिछाडीस येऊं शकली.        

 लिओनिडास पळून गेला असता , तर त्याचा बचाव झाला असता. पण स्पार्टाचा कायदा असा होता कीं , स्पार्टन लोकांनी रणांगणांतून पळ काढतां नये , अशा कचाट्यांत सांपडून त्यानें ह्या बिकट प्रसंग शूर पुरुषास शोभणारें निश्चयाचें वर्तन केलें , तीनशें स्पार्टन , सातशें थेस्पियन आणि चारशें थीबन इतके लोक त्यानें आपल्याजवळ ठेविले , आणि बाकीच्यास रजा दिली. ही लहानशी फौज त्यानें कझर्विीसच्या प्रचंड सेनासमूहाशीं टक्कर देण्याकरितां सज्ज केली , पैकीं चारशें थीबन लोक होते ते आरंभींच रणांगण सोडून चालते झाले. बाकीचे मात्र सर्व अशा निकराने लढले कीं , त्यांपैकी एकही इसम जिवंत राहिला नाहीं.

 ह्याप्रमाणें ती अरुंद वाट ताब्यांत येतांच इराणी फौज फोसिस प्रांतांतून जाळपोळ व लुटालूट करीत पुढे आली. बिओशियांतील लोकांनी तिचा प्रेमानें सत्कार केला. एक इराणी तुकडी डेल्फायवर आली ; पण डेल्फायच्या लोकांनीं निकरानें लहून तीस परत घालविलें.

 तथापि आथेन्सच्या बाजूचे लोक इतके सोडून गेले , की आर्थि नियन लोकांचा नाइलाज झाला ; तेव्हां ते आथेन्स शहर सोडून व बायकामुले आणि घेतां आली तेवढी मालमत्ता घेऊन , जहाजांत बसून निघून सलामिस व ईजीना ह्या बेटांत निघून गेले. फक्त थोडे लोक मागें राहिले , त्यांनी किल्ल्यांत जाऊन दरवाजे बंद केले. त्यावर शत्रूंनी हल्ला केला. तथापि सर्व असामी पडले , तेव्हांच आथेन्सचा किल्ला इराणी लोकांच्या हाती आला.

 पुढें सलमिस बेट आणि ग्रीस देश यांजमध्यें अरुंद समुद्र आहे , त्यांत इराणी आरमार आलें. ह्या ठिकाणी मात्र ग्रीक लोकांचें दैव उदयास आलें. ग्रीक आरमारावर थेमिस्टॉक्लिस हा मुख्य होता. त्यानें इराणी आरमारावर हल्ला करून त्या सर्वांचा पन्ना उडविला. ह्या समुद्रावरील झुंजास सलामिसची लढाई असें म्हणतात. ह्या लढाईनें युद्धाचा शेवटच झाला. समुद्रांत आरमारांची लढाई चालली होती ती पाहत क्सक्स किनाऱ्यावर आपली फौज सज्ज करून बसला होता. डोळ्यांसमोर आपले सर्व आरमार गडप झालेले पाहून त्याचा धीर सुटला ; आणि त्यास मोठी दहशत पडली. आरमाराशिवाय युद्ध चालविणे शक्य नव्हतें ; तेव्हां झालें इतकेंच पुरे असे समजून , तो तसाच त्वरेनें परत स्वदेश निघाला. त्याची फौज मागें राहिली , तीवर मार्डीनियस ह्यास त्यानें मुख्य सेनापति नमिलें.

 आथेन्स शहरांत जें कांहीं उरलें होतें तें सर्व मार्डोनियस ह्यानें जाळून नाहींसें केलें. पुढें बिओशिया प्रांतांत प्लाटिया ( Plataea ) येथें इराणी फौजेची व ग्रीक फौजेची लढाई होऊन मार्डोनियस भारला गेला. त्याच दिवशीं आशियामायनरांत मायकेलं येथेही इराणी लोकांचा पराभव झाला. ग्रीक लोकांनी इराणी फजिचा थेट त्यांच्या छावणीपर्यंत पाठलाग करून बहुतेकांस कापून काढिलें. नंतर श्रीब्सचे लोक आरंभीच इराणी लोकांस मिळाले होते , त्यांचं पारिपत्य करण्याकरितां ग्रीक फौज थीब्स शहरावर आली ; व तेथच्या पुढा - यांस पकडून त्यांनीं कॉरिन्थ येथें पाठविलें. तेथें स्वराष्ट्रद्रोहाबद्दल त्या सर्वां चा शिरच्छेद करण्यांत आला. ह्याप्रमाणें क्झक्शसची स्वारी संपली.

 ह्या युद्धांत आथेन्सचें सर्वस्वी नुकसान झालें. घरेंदारें शेतेंभातें वगैरे सर्व उद्धस्त झाली. तथापि आथेन्सचे लोक न डगमगतां दृढनिश्चयानें पुनरपि सर्व जमवाजमव करूं लागले ; व पहिल्यापेक्षांही जास्त टुमदार शहर त्यांनीं उठविलें. ह्या नवीन शहराचा तट सात मैल परीघाचा होता ; परंतु एवढा विस्तार इमारतींनीं कधींच भरून आला नाहीं. आंत पुष्कळ रिकामी जागा होती , तींत परचक्र आलें असतां बाहेरच्या खेड्यांतील लोकांस आपली मालमत्ता घेऊन राहतां येत असे. बाहेरच्या लोकांची ही मोठी सोय झाली ; कारण आथे न्सचे पुष्कळ धनाढ्य लोक बाहेरच्या खेड्यांतील आपल्या मालकीच्या जमिनीवर बंगले बांधून राहत असत , त्यांस युद्धप्रसंग आला असतां शहरांत येऊन राहण्याची सोय झाली.

 मारेथॉनच्या लढाईनंतर लवकरच आथेन्सचा शूर सेनापति मिल्टियाडिस ह्याजवर राजद्रोहाचा आरोप येऊन त्याजला अडीच लाख रुपये दंड करण्यांत आला. तो त्यानें न दिल्यामुळे त्यास कैदेत टाकिलें , तेथेंच तो मृत्यु पावला. पण आथेन्सचा कायदा असा होता की , बापाची शिक्षा मुलानें भोगावी. तदनुसार मिल्टि याडिसचा मुलगा सायमन ( Simon ) ह्यास , दंड न भरल्यामुळे , कैदेंत जावे लागलें. पुढें कल्यास नांवाच्या आथेन्सच्या एका साव कारानें सायमनचा दंड भरून त्यास बंधमुक्त केलें ; त्याबद्दल साय मननें आपली बहीण कल्यास ह्यास देण्याचें वचन दिलें. कालांत रानें सायमन ह्यास वडिलोपार्जित जिंदगी मिळाली , व युद्धांतील लूटही पुष्कळ प्राप्त झाली. तेणेंकरून तो मातवर बनला.


प्रकरण आठवे - सायमन व पेरीक्लीज

   क्शर्विशसचा पराभव झाला तरी युद्ध थांबलें नाहीं. पूर्वेकडील ग्रीक प्रदेशांत उभय पक्षांची झटापट चाललीच होती. थेमिस्टॉक्ली वर देशद्रोहाचा आरोप येऊन त्यास देशत्यागाची शिक्षा झाली असल्यामुळे , सायमन हा सेनापती झाला होता. त्यानें समुद्रावर व जमिनीवर इराणी फौजेशी लढून अनेक विजय संपादिले. इ.स.पू. ४६६ ह्या वर्षी आशियामानयरच्या किनान्यावर युरिमिडॉन येथे त्यानें इराणी फौजेचा पुरा फन्ना उडविला , इराणी आरमार नाहींसें केलें , व पुष्कळ लूट संपादन केली.

 ह्यामुळे सायमनचा लौकिक मोठा वाढला ; आणि आथेन्सचा राज्यकारभार आपल्या हार्ती असावा अशी त्यास इच्छा उत्पन्न झाली. पण पेरिक्लीज म्हणून त्यास एक प्रतिसर्धी होता. तो प्रजा पक्षाचा मुख्य असून सायमन हा सरदार लोकांचा मुख्य होता. सायमन मोठा पैसेवाला होता. त्याने अनेक प्रकारचा दानधर्म व खर्च करून लोकांची प्रीति संपादन केली. त्यानें आपल्या बागा व फळांचे मळे सर्व लोकांस खुले केले. त्याच्या पंक्तीस सर्व जातभाईस भोजन मिळे. तो बाहेर पडे तेव्हां त्याचे नोकर गरीबांस पैसे व कपडे वांटीत त्याजपुढें चालत. त्यानें बागा तयार केल्या , धर्म शाळा बांधिल्या आणि दुसरी पुष्कळ सार्वजनिक कामे केलीं , त्यांचा लोकांस मोठा उपयोग झाला. थीसियसच्या मोठ्या देवळाचा कांहीं पडका भाग अजून दृष्टीस पडतो. तें देऊळ सायमननें बांधिलें आथेन्स शहर व त्याची दोन बंदरें ह्यांजमध्ये त्यानें दोन मोठ्या भिंती बांधून त्यांजमधून दोहोंस जोडणारा चांगला सुरक्षित रस्ता नवीन बांधिला , इतकी कामे केलीं तरी त्याचा हेतु सिद्धीस गेला नाहीं. थेमिस्टॉक्लीसप्रमाणे त्यासही शिक्षा झाली. त्यास देशत्याग करावा लागला. तेव्हां अर्थात् आथेन्सचा सर्व कारभार पेरिक्लीजच्या हातीं आला.

 इराणी फौजेचा पराभव करण्यांत आयेन्स आणि स्पार्टा ह्रीं दोन संस्थानें प्रमुख होतीं. ह्यापुढे दोघांनाही ग्रीस देशांत प्रमुख होण्याची संधि आली होती. त्यांत स्पार्टाचें वर्चस्व थोडेसें ज्यास्तच होतें. परंतु तेथील लोकांच्या अंगीं बादशाही पद धारण करण्यास लागणारा जोम नव्हता. त्यांना आरमार नको होतें , व आरमाराशिवाय दूरदूरचे प्रदेश ताब्यांत ठेवणे शक्य नव्हतें. तसेंच परिस्थिति बदलेल त्याप्रमाणे स्पार्टन लोकांस आपली व्यवस्था बदलतां येत नसे , त्यांना नवीन सुधारणा नको होत्या. कोणी एकादा अक्कलवान पुरुष पुढे येऊन नवीन व्यवस्था करूं लागला , कीं तो त्यांस अप्रिय होई. आहे तेवढ्यांत आपला बचाव करावा , उगाच बाहेरच्या भानगडींची उठाठेव करूं नये , असे स्पार्टाचें धोरण होतें. अमुक एक ठरीव पद्धत कायमची न स्वीकारतां , ऐन प्रसंगी एकदम कांहीं तरी निश्चय करून त्याप्रमाणे वागणें ही स्पार्टाची पद्धत होतीं. स्वतःच्या संस्था नापलीकडे इतर ग्रीक संस्थानांची त्यास परवा वाटत नसे.

 पण आथेन्सचें धोरण निराळें होतें. इराणी युद्धांत मिळालेल्या विजयाचा फायदा घेऊन आथेन्सनें बहुतेक ग्रीक संस्थानांची एक जूट जमविली ; आणि स्वतः पुढाकार घेऊन एक प्रकारची नवीन बादशाही स्थापन केली. म्हणजे पूर्वी प्रत्येक ग्रीक संस्थान स्वतंत्र व विसकळित होतें ; पण आतां परशत्रूच्या हल्लयानें उत्पन्न झालेल्या अडचणींमुळें , बहुतेक संस्थानें एक झार्ली , आणि त्यांचे प्रमुखपण आधेन्सला प्राप्त झालें. इराणी लोकांचा पराभव झाला तरी ठिक ठिकाण इराणची ठाणीं होतीं. त्यामुळे आयोनिया वगैरे दूरदूरच्या संस्थानांस स्वतःच्या बचावासाठी एक जूट करणे जरूर वाटलें. इराणच्या जुलमापासून ग्रीक संस्थानांचा बचाव करणे , आणि इराणी मुलखांवर ताव मारून आपली संपत्ति वाढविणें , हे ह्या जुटीचे मुख्य उद्देश होते. डेलॉस म्हणून एक बेट होतें , त्या ठिकाणी ह्या जुटींतील संस्थानांनी आपला मुख्य खजिना ठेविला , आणि तेथेंच व्यवस्थापक सभाही भरूं लागली. त्यावरून ह्या जुटीस "डेलॉसची जूट" असें नांव पडलें.    

 ह्या जुटींत समुद्रकाठी असलेली सर्व ग्रीक संस्थान सामील झाली. सर्वांनी शक्त्यनुसार मदत करून एक मोठें आरमार तयार केलें. कित्येक संस्थानें अगदींच लहान व गरीब होती. त्यांस सबंध जहाजें देण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांनी थोडीबहुत रोख रक्कम द्यावी असा ठराव झाला. अशा प्रकारें ह्या संस्थानांचे प्रथम दोन वर्ग झाले : एक सबंध जहाजें देणारांचा , व एक रोख रकमा देणा रांचा. दुसरा वर्ग मोठा होता. अॅरिस्ट्रायडिस म्हणून आथेन्सचा एक हुशार मुत्सद्दी होता , त्यानें ही जूट जमवून आणिली. निरनि राळ्या संस्थानांची ऐपत टरवून , कोणी किती मदत करावी , ही त्यानेंच ठरवून दिले , म्हणून अॅरिस्टायडिस ह्यास ह्या जुटीचा संस्था पक असे म्हणतात , ॲरिस्टायडिसबरोबर थेमिस्टॉक्लिसही तेंच काम करीत होता. ह्या दोघांनी डेलॉसच्या जुटींत अथेन्सला प्रमुख पद मिळवून दिले. पैशाची व आरमाराची सर्व व्यवस्था आथेन्सच्याच हातांत होती. त्यामुळे लवकरच सर्व संस्थानांचे स्वातंत्र्य हिरावून त्यांजवर आथेन्सने आपले स्वामित्व बसविले. हे स्वामित्व स्थापन करणारा पुरुष सायमन होय. जुटीनें स्थापन केलेले मोठें आरमार घेऊन त्यानें प्रथम इराणच्या ताब्यांतील कांहीं प्रदेश काबीज केले ; आणि पुढे त्याच आरमाराच्या जोरावर , कित्येक ग्रीक संस्थानें जुटींत सामील होण्यास नाखुप होतीं , त्यांस जिकिलें. येणेंकरून जुटींतील संस्थानांची संख्या दोनशेंवर झाली. इतकी शक्ति येतांच डेलॉस येथील खजिना आथेन्स येथें आणिला. तेव्हां - पासून अथेन्स येथील ग्रीक बादशाहीचा आरंभ धरितात. ( इ.स.पू. ४५४ ). ह्याप्रमाणे आथेन्सची सत्ता ईज्यनसमुद्रांतील बहुतेक बेटांवर आणि स व मासिडोनिया यांतील ग्रीक शहरांवर पसरली. हें आयेन्सचे वर्चस्व सुमारें पन्नास वर्षे टिकलें तें फार दिवस टिकलें नाहीं ह्याचं कारण , एकानें दुसऱ्याच्या ताब्यांत राहवें असा मुळीं ग्रीक लोकांचा स्वभावच नव्हता. आपणास पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे असें प्रत्येक शहरास वाटत होतें. परकीय शत्रु आला असतां सर्व शहरें एकी करण्यास कबूल झाली तरी , तो शत्रु नाहींसा होतांच , प्रत्येकास स्वतंत्रता हवीशी वाटली. आथेन्सचा दिमाख त्यांस सहन झाला नाहीं. स्पार्टा व त्याच्या लगामांतील इतर संस्थानें डेलॉसच्या जुटींत कधींच सामील झाली नाहीत.    

 आथेन्सची ही वाढती सत्ता स्पार्टास खपली नाहीं. त्या दोघांत युद्ध जुंपले ; पण पांच वर्षेपावती तह होऊन तें थांवले. सायम नची शिक्षा रद्द होऊन तो परत आला होता , तो ह्या वेळेस मरण पावला ; आणि तहाचीं पांच वर्षे भरण्यापूर्वी आथेन्स व स्पार्टा झांज मध्ये पुनः समुद्रावर युद्ध जुपलें. त्याचे कारण असे झाले कीं , डेल्फायचें देऊळ व त्यांतील देवाची सर्व मालमत्ता संभाळण्याचें काम डेल्फाय येथील लोकांच्या हातांत होतें. देवपूजेचें कामही तेथच्याचं कित्येक मोठमोठ्या कुटुंबांकडे वंशपरंपरेनें चालू होतें. डेल्फाय शहर फोसिस संस्थानाच्या ताव्यांतले असून , फोसिसचे अधिकारी डेल्फायच्या मंदिरांतील वरील हक्कांकरितां भांडूं लागले. ह्या भांडणांत आथेन्सनें फोसिसला मदत केली. इकडे स्पार्टानें डेल्फायचा पक्ष स्वीकारिला , व सर्व मंदिर परत तेथील लोकांच्या ताब्यांत दिले. स्पार्टीने केलेल्या ह्या मदतीबद्दल डेल्फायच्या लोकांनी स्पाटीला असा एक हक दिला की , ज्या वेळेस पुष्कळ संस्थानांचे वकील भविष्य वर्तविण्यास येतील , त्या वेळेस स्पार्टाचा कौल सर्वांच्या अगोदर लावावा. डेल्फायच्या लोकांनी ह्या हक्काचा मजकूर एका दगडी खांबावर खोदून ठेविला. पुढे स्पार्टाच्या फौजा परत गेल्या , तेव्हां पेरिक्लीज आयेन्सची फौज घेऊन डेल्फायबर चालून आला. त्यानें डेल्फायचें मंदिर काबीज करून , तेथचे सर्व हक्क फोसिसच्या लोकांस दिले ; आणि प्रथम कौल घेण्याचा हक्क अथेन्सचा ठरवून , तो , स्पार्टाचा हक ज्या खांबावर खोदला होता त्याच खांबावर खोदून ठेविला हैं एक कारण आथेन्स व स्पार्टाच्या वैमनस्यास झालें , व आणखीही कित्येक कारणें झाली. त्यामुळें युद्ध जुंपून तें तीन वर्षे चाललें. त्यांत स्पार्टाचा जय होऊन अनेक अटी कबूल करून आथेन्सला तह करणें प्राप्त झालें. इ.स.पू. ४४५ ह्या वर्षी दोघांचा तीस वर्षेपावेतों सलोख्याचा तइ ठरला.    

 इ.स.पू  ४६० पासून ४३० हीं तीस वर्षे पेरिक्लीजच्या कारभाराची म्हणून प्रसिद्ध आहेत. पेरिक्लीजचा लौकिक फार मोठा आहे. त्या वेळच्या सर्व मुत्सद्यांत पेरिक्लीज अग्रगण्य असून त्याची राज्यकारभार करण्याची कुशलता , त्याची विद्वत्ता , व आधेन्स येथे मोठमोठी कामे करून त्यानें केलेली सुधारणा , झांविषयीं त्याची मोठी ख्याति आहे. त्यानें सर्व सुधारणा लोकांच्या पैशांतूनच केल्या , व लोकांनीं खर्च करण्यास नाखुषी दाखवूं नये म्हणून सार्वजनिक पैशांतून गरीबांस अन्न व करमणुकीचीं साधनें करून दिली. त्यानें सार्वजनिक सणांची संख्या वाढविली ; नाटकगृहें दररोज खुलीं ठेविलीं ; व ज्यांस नाटकाचें तिकीट घेण्याची ऐपत नव्हती , त्यांस सरकारी खजिन्यांतून पैसा देण्याची त्यानें सोय केली. तसेंच कोर्टात लोकांस जूरर नेमीत , त्यांस कामाच्या दिवसांचा पगार देण्याचा पेरिक्लीजने ठराव केला. येणे करून तो फार लोकप्रिय झाला. दुसरा एक कायदा पेरिलीज असा केला कीं , ताब्यांतील संस्थानांचे सर्व खटले शेवटीं निकालास आथेन्स येथें यावे. त्यायोगें आथेन्सचें काम आणि महत्त्व फार वाढलें.

 जुटर्टीतील संस्थानांकडून आथेन्सला करभार येत असे , तो पेरिक्लीजनें वाढविला. पूर्वी तो ४६० टॅलेट म्हणजे २३ लक्ष रुपये होता , तो आतां ६०० टॅलॅट म्हणजे ३० तीस लक्ष रुपये झाला. अशा रीतीनें ज्यास्त आलेला पैसा खर्च करून त्यानें आथेन्स येथे मोठ मोठे सुंदर वाडे बांधिले , आणि दुसरी कलाकौशल्याची कार्मे तयार केलीं. सायमननें सुरू केलेले लांब तट पेरिक्लीजनें पुरे केले ; इराणी लोकांनी पाडिलेलीं देवळें दुरुस्त केली , आणि नवीन भव्य मंदिरें बांधिलीं , त्यांपैकी पार्थिनॉन नांवाचें आथिनी देवीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. ते किल्ल्याच्या आंत शहराचे मध्यभागीं होतें. त्यांतील कित्येक कसबाची कामें अत्यंत प्रेक्षणीय होतीं. त्यावर फिडियास नांवाचा मुख्य कारागीर असून त्यानें केलेले कित्येक पुतळे हल्लीं ब्रिटिश म्यूझियममध्यें आहेत , तेथें त्यांस ' एल्जिन आरसपान ' असें नांव आहे. आथिनी देवीचा पुतळा सुमारे ४० फुट उंच , हस्तिदंताचा व सोन्याचा केलेला होता : म्हणजे मूळ सर्व पुतळा लांकडी करून , त्यावर सर्वत्र हस्तिदंत जडवून वस्त्राचे भाग सर्व सोन्याचे केलेले होते.

 ह्याशिवाय प्रोपिली ( Propyl ) व ओडियम ( Odeum ) ही दोन उत्कृष्ट कामें पेरिक्लींजची आहेत. किल्ल्यांत जाण्याचा रस्ता होता , त्याच्या दोहों बाजूंस भिंतीवर खोदीव नकशीचें व चित्रांचें काम केलेलें होतें ; व आंत शिरण्याच्या मुख्य द्वाराला पांच मोठाले धातूचे दरवाजे व सहा आरसपानी भव्य खांच होते. रस्त्याला प्रोपिली असें नांव होतें. ओडियम म्हणून एक सुंदर व भव्य नाटकगृह असून , त्यांत लोकांच्या करमणुकीसाठीं गायनाचे समारंभ होत असत. ह्या इमारतींच्या योगानें शहरांतील सुतार , लोहार , सोनार , गंवडी , पाथरवट म्ह ० पुतळे खोदणारे , चित्रकार वगैरे अनेक प्रकारच्या कारागिरांस मुबलक काम मिळालें.

 झिक्स म्हणून एक खुली जागा होती तेथील भव्य इमारतीत लोकनियुक्त सभेची कचेरी भरत असे. ती शहरांतील आगोरा नांवाच्या मुख्य चौकाजवळ होती. रोमचें जसें फोरम तसें आथेन्सचें आगोरा , म्हणजे शहरचा मुख्य चौक होय. ह्या सभागृहाची बांधणी वर्तुळाकार असून त्यांतील एका बाजूस न्यायाची कोटें असत. सभेचा मुख्य दिवाणखाना पांचशें सभासद बसण्यास पुरेसा होता. निक्सच्या पाठीमागें मूळचेंच एक लांबच्या लांच दगडी टैंकाड असून , त्यामुळे त्याच्या एक बाजूचा बंदोबस्त झाला होता. इमारतीच्या मध्यभागी दगडांत कोरलेले उंच व्यासपीठ होतें , त्यावर चढण्याच्या पायव्याही दगडांतच कोरून केलेल्या होत्या. जेव्हां सभेत बोलण्याचा कोणास प्रसंग येई , तेव्हां त्यानें त्या पाया चढून व्यासपीठावर जाऊन बोलावें असा निर्बंध होता. ह्यामुळे सार्वजनिक प्रश्नांची चर्चा सर्व लोकांस कळे , व सर्व लोक आपले हात उचलून मतें देत.    

 आथेन्स व स्पार्टा ह्यांजमधील मार्गे सांगितलेला तह होऊन सुमारें चौदा वर्षे झाली ; तोच त्यानच्यामधे  पुनरपि भांडणें उपस्थित झाली , त्यामुळे पुनः युद्ध सुरू झालें.